शनी जयंती २०२६: ऑफिसच्या कामात व्यग्र आहात? तरीही शनी देवाला प्रसन्न करतील 'हे' २ सोपे मंत्र!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 11:15 IST2026-05-16T10:31:55+5:302026-05-16T11:15:53+5:30
Shani Dev Mantra for Blessing: शनी जयंती २०२६: आज शनी जयंती आणि शनी अमावस्या आहे, या दुर्मिळ योगावर शनी उपासनेची संधी सोडू नका, वेळ मिळेल तेव्हा म्हणा हे दोन मंत्र.

शनी जयंती २०२६: ऑफिसच्या कामात व्यग्र आहात? तरीही शनी देवाला प्रसन्न करतील 'हे' २ सोपे मंत्र!
आज शनिवार, १६ मे २०२६. आजचा दिवस आध्यात्मिक दृष्टिकोनातून अत्यंत दुर्मिळ आणि महाफलदायी आहे, कारण आज शनी जयंती(Shani Jayanti 2026) आणि शनी अमावस्या(Shani Amavasya 2026) असा अद्भुत महासंयोग जुळून आला आहे. शनी देवाचा प्रकोप शांत करण्यासाठी, साडेसातीचा त्रास कमी करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आजच्यासारखा दुसरा मोठा मुहूर्त नाही.
हे ही वाचा : शनी जयंती २०२६: कर्माचा हिशोब अन् धनाची आवक; 'या' राशींसाठी १६ मे ठरणार गेम-चेंजर!
जर तुम्ही ऑफिसच्या कामात किंवा दैनंदिन धावपळीत व्यस्त असाल आणि मोठी पूजा-अर्चा करणे शक्य नसेल, तर अजिबात काळजी करू नका. शास्त्रानुसार, आज दिवसभरात जेव्हा जेव्हा आठवण येईल, तेव्हा केवळ 'हे' २ मंत्र अवश्य म्हणा.
१. पहिला महामंत्र: 'ओम शनैश्चराय नमः'
हा शनी देवाचा सर्वात सोपा, विधीविरहित आणि अत्यंत प्रभावी नाममंत्र आहे. हा मंत्र शनी देवाच्या सकारात्मक ऊर्जेला तुमच्याकडे आकर्षित करतो.
कसा करावा जप? आज दिवसभरातून वेळ काढून किमान एकदा तरी शांत चित्ताने १०८ वेळा या मंत्राचा जप करा.
हे ही वाचा : शनी जयंती २०२६: तुम्हाला माहीत आहे का? शनी जयंतीला पिंपळाखाली 'कणकेचाच दिवा' का लावतात?
कामातून ब्रेक घेताना वापरा ही ट्रिक: जर तुम्ही ऑफिसमध्ये असाल आणि सलग स्क्रीनसमोर बसून काम करत असाल, तर दर एक-दोन तासांनी जेव्हा तुम्ही जागेवरून उठून छोटा ब्रेक घ्याल, तेव्हा मनातल्या मनात ५ किंवा ११ वेळा हा मंत्र म्हणा. यामुळे कामाचा मानसिक ताण तर कमी होईलच, पण शनी देवाचे स्मरणही सतत राहील.
२. दुसरा महामंत्र: शनी ध्यान श्लोक
हा श्लोक शनी देवाचे महात्म्य आणि त्यांचे स्वरूप अचूकपणे सांगतो. याचे पठण केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.
"नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजम्।
छायामार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरम्।।"
या श्लोकाचा अर्थ काय? जो निळ्या काजळाप्रमाणे (किंवा पर्वताप्रमाणे) तेजस्वी चमकणारा आहे, जो सूर्यदेवाचा (मार्तंड) पुत्र आणि यमराजाचा मोठा भाऊ आहे, ज्याचा जन्म माता छाया आणि सूर्यदेव यांच्यापासून झाला आहे, अशा कर्माचे फळ देणाऱ्या शनी देवाला मी साष्टांग नमस्कार करतो.
हे ही वाचा : शनी जयंती २०२६: शनी देवाची कृपा हवीय? तर दर्शनावेळी 'या' नियमांचे पालन नक्की करा
महत्त्व: आज संध्याकाळी देवापुढे मोहरीच्या तेलाचा दिवा लावून हा श्लोक किमान ३ वेळा म्हणावा. जर मंदिरात जाणे शक्य नसेल, तर घरातच शनी देवाच्या प्रतिमेचे किंवा चित्राचे ध्यान करून हा श्लोक म्हटल्यास साडेसाती आणि ढैयाच्या त्रासापासून मोठा दिलासा मिळतो.
कर्म हीच पूजा: शनी देव कर्माचे राजे आहेत. त्यामुळे मंत्र जपासोबतच आज कोणाचाही अपमान न करणे, गरजूला मदत करणे किंवा मुक्या प्राण्यांना अन्न-पाणी देणे ही शनी देवांची सर्वात मोठी सेवा ठरेल.
हे आवर्जून करा: सलग बसून काम करणाऱ्यांनी आज संध्याकाळी थोडा वेळ चालण्याचा किंवा हलका व्यायाम करण्याचा संकल्प करावा, कारण शनी देवाला आळस अजिबात आवडत नाही.