मार्च करेल मालामाल: ७ राशींवर ५ ग्रहांची कृपा, इन्कम वाढेल; परदेशवारी योग, सुख-वैभवाचा काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 01:39 PM2024-02-28T13:39:59+5:302024-02-28T13:49:51+5:30

मार्च महिन्यातील ग्रहस्थितीचा आणि जुळून येणाऱ्या शुभ योगांचा ७ राशींना नफा, फायदा मिळू शकतो, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या...

ज्योतिषशास्त्रानुसार, मार्च महिना अनेकार्थांनी शुभ ठरणार आहे, असे म्हटले जात आहे. मार्च महिन्यात नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध ०७ मार्च रोजी मीन राशीत प्रवेश करणार आहे. याचवेळी बुधाचा मीन राशीत उदय होणार आहे. ०७ मार्च रोजी शुक्र हा कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. कुंभ राशीतील शनी आणि सूर्य या ग्रहांशी शुक्राचा युती योग जुळून येणार आहे. तर, १४ मार्च रोजी नवग्रहांचा राजा सूर्य ग्रहाच्या मीन प्रवेशाने मीन संक्रांती प्रारंभ होईल.

सूर्याच्या मीन प्रवेशामुळे बुध आणि सूर्याचा बुधादित्य योग जुळून येईल. तसेच सूर्य आणि राहुचा ग्रहण योगही जुळून येणार आहे. १५ मार्च रोजी नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ कुंभ राशीत प्रवेश करेल. कुंभ राशीतील शनी आणि शुक्र यांच्याशी मंगळाचा युती योग जुळून येईल. तर १८ मार्च रोजी शनीचा कुंभ राशीत उदय होणार आहे.

विशेष म्हणजे शुक्र आणि बुध हे दोन्ही ग्रह दोनवेळा राशीपरिवर्तन करणार आहे. ०७ मार्चला मीन राशीत विराजमान झाल्यानंतर २५ मार्च रोजी बुध मेष राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत असलेल्या गुरु ग्रहाशी बुधाचा युती योग जुळून येईल. तर, ०७ मार्च रोजी शुक्र कुंभ राशीत विराजमान होणार असून, ३१ मार्च रोजी शुक्र मीन राशीत प्रवेश करेल.

शुक्राचा मीन राशीत प्रवेश झाल्यानंतर सूर्य, राहु आणि शुक्र यांचा त्रिग्रही योग जुळून येणार आहे. या एकूणच ग्रहस्थितीचा कोणत्या राशीच्या व्यक्तींना करिअर, शिक्षण, कुटुंब, आर्थिक आघाडी, व्यवसाय या आघाड्यांवर उत्तम लाभ मिळू शकतो, असे सांगितले जात आहे. जाणून घेऊया...

मेष: एकामागून एक अनेक शुभ आणि यशस्वी कार्यक्रम होणार आहेत. विविध क्षेत्रात यश मिळेल. स्पर्धा परीक्षेत अपेक्षित यश मिळू शकते. प्रेमसंबंध पूर्वीपेक्षा अधिक घट्ट होतील. प्रिय जोडीदारासोबत आनंददायी क्षण घालवाल. रागावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. विरोधक आणि शत्रू पराभूत होतील. भौतिक सुखसोयींवर पैसे खर्च कराल.

वृषभ: मार्च महिना लाभदायक ठरू शकतो. वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. कुटुंबासोबत आनंदाने वेळ घालवण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला आहे. एखाद्या स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळू शकते. जे बेरोजगार आहेत त्यांना नोकरीची संधी मिळू शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. आर्थिक स्थिती सुधारू शकेल.

कर्क: मार्च महिना अनुकूल ठरू शकतो. नोकरी किंवा व्यवसायासाठी परदेशात जायचे आहे, त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते. विवाहेच्छुकांसाठी एखादे चांगले स्थळ येऊ शकते. नोकरदारांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. कनिष्ठ आणि वरिष्ठांकडून सहकार्य मिळू शकते. मालमत्ता आणि वाहन खरेदी करू शकता. व्यावसायिकांना चांगला फायदा होऊ शकतो. बिझनेसमध्ये एखादी मोठी डील फायनल होऊ शकते.

सिंह: मार्च महिन्यात सकारात्मक परिणाम मिळू शकतात. नशिबाची, भाग्याची साथ मिळू शकेल. उत्पन्न वाढेल. आत्मविश्वास वाढेल. आरोग्य सुधारेल. आर्थिक बाजू मजबूत असेल. काम-व्यवसायाशी संबंधित कारणांसाठी देश आणि परदेशात प्रवास करू शकता. काही महत्त्वाचे निर्णयही घ्याल, जे शुभ सिद्ध ठरू शकतील. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकेल. मन खूप प्रसन्न राहील. सन्मान वाढेल. सर्व काम होईल. आरोग्याबाबत बेफिकीर न राहण्याचा सल्ला दिला जात आहे.

तूळ: अपेक्षित यश मिळेल. कौटुंबिक जीवन आनंदी असणार आहे. यशासोबतच मान-सन्मान मिळेल. प्रभावशाली व्यक्तीच्या संपर्कात आल्याने आर्थिक लाभाची संधी मिळेल. लाभाचे अतिरिक्त स्रोत मिळतील. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीकडून पूर्ण सहकार्य मिळेल. नोकरदारांवर कामाचा ताण थोडा अधिक असणार आहे.

मकर: आगामी काळ अधिक शुभ आणि यशकारक ठरू शकेल. काही विशेष कामात यशाची चांगली बातमी मिळेल. करिअर आणि व्यवसायासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. कामाच्या ठिकाणी गुप्त शत्रूंपासून थोडेसे सुरक्षित राहावे. मैत्रिण प्रेम जीवनातील गैरसमज दूर करण्यात यशस्वी होईल. व्यस्त वेळापत्रकातून जोडीदारासाठी वेळ काढण्याची खात्री करा.

मीन: मार्च महिना आनंद आणि सौभाग्य घेऊन येणारा ठरू शकेल. किरकोळ अडथळे आले तरी कामात यश मिळेल. मुलांशी संबंधित कोणतेही यश कुटुंबात आनंद आणेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. प्रवास आनंददायी आणि फायदेशीर ठरेल. कुटुंबासह शुभ कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. एखाद्या प्रिय व्यक्तीशी तुमची भेट सोनेरी दिवसांची आठवण करून देईल.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.