Astrology Predictions 2026 : ज्योतिषांचे भाकीत, आर्थिक धक्के पचवून, २०२६ मध्ये भारत होणार 'विश्वगुरू'!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 10:26 IST2025-11-21T10:16:20+5:302025-11-21T10:26:51+5:30
Astrology Predictions 2026 : २०२६ हे वर्ष ज्योतिषशास्त्र आणि पंचांगानुसार 'रौद्र संवत' म्हणून सुरू होणार आहे. या वर्षात राजा गुरु (बृहस्पति) आणि मंत्री मंगल (मंगळ) हे ग्रह असतील. ग्रहांच्या या बदलामुळे येणारे वर्ष भारत आणि जगासाठी अनेक महत्त्वपूर्ण घटना आणि आव्हाने घेऊन येणार आहे.

२०२६ ची ग्रहस्थिती
वैदिक पंचांगानुसार, २०२६ चा राजा गुरु (बृहस्पति) असेल, तर मंत्री मंगल (मंगळ) असेल. गुरु राजा असल्याने धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना विशेष महत्त्व प्राप्त होईल. धर्मप्रचार आणि धार्मिक आयोजनांमध्ये लोकांचा सहभाग वाढेल. मंगल मंत्री असल्याने सामाजिक आणि राजकीय वातावरण अशांत राहण्याची शक्यता आहे. लोकांमध्ये क्रोध, विद्रोह आणि उत्तेजना वाढेल.

जागतिक आणि राजकीय तणाव
ज्योतिषीय गणनेनुसार, २०२६ मध्ये अनेक देशांमध्ये तणाव, संघर्ष आणि प्रतिस्पर्धी राष्ट्रांमध्ये तीव्र मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे. जगभरात सामाजिक आणि राजकीय अस्थिरता वाढेल. अनेक देशांमध्ये छोटे-मोठे संघर्ष आणि विद्रोह होऊ शकतात.

आंतरराष्ट्रीय चर्चा
भारत-चीन, अमेरिका-रशिया, अमेरिका-इराण यांसारख्या विरोधी देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी वेळोवेळी चर्चा आयोजित केल्या जातील, पण तणाव पूर्णपणे कमी होणार नाही.

सैनिक आणि व्यापार युद्ध:
१३ मार्च ते ११ जुलै २०२६ दरम्यान कालसर्प योग आणि १९ मार्च २०२६ च्या नवसंवत्सर कुंडलीत 'मंगल-राहू' आणि 'सूर्य-शनी'चा योग तयार होत असल्याने सशस्त्र युद्धासोबतच 'व्यापारी युद्ध' (Trade War) होण्याची शक्यता आहे. अनेक देश व्यापार धोरणांमध्ये मोठे बदल करतील आणि एकमेकांवर कर वाढवू शकतात.

सायबर गुन्हेगारीत वाढ :
लोकांमध्ये अधिकाधिक पैसा कमावण्याची लालसा वाढेल, पण त्या प्रमाणात असमाधान राहील. याचा परिणाम महागाई वाढण्यात होऊ शकतो. या वर्षात सोने, चांदी आणि अन्य धातूंच्या किमतींमध्ये जबरदस्त वाढ (तेजी) होण्याची शक्यता आहे. सायबर फसवणूक (Cyber Fraud) आणि सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

आर्थिक संकट आणि महागाई (Inflation)
२०२६ मध्ये जागतिक स्तरावर आर्थिक आव्हाने आणि वित्तीय समस्यांना तोंड द्यावे लागेल. देशांतर्गत अर्थव्यवस्थेमध्ये थोडी घसरण होऊ शकते. केंद्र सरकारला विशेषत: परराष्ट्र धोरणांवर आणि अर्थव्यवस्थेच्या आघाडीवर मोठ्या आव्हानांना तोंड द्यावे लागू शकते.

नैसर्गिक आपत्तीमध्ये वाढ:
मकर, कुंभ आणि मीन राशीत चार महिन्यांसाठी तयार होणारे चतुर्ग्रही आणि पंचग्रही योग, भारताच्या राजकीय वातावरणात मोठी अशांतता आणि तणाव निर्माण करू शकतात. अग्निकांड (Fire Incidents) आणि नैसर्गिक आपत्त्यांची शक्यता वाढू शकते.

भारताची उज्ज्वल प्रतिमा:
या सर्व आव्हानांदरम्यान एक सकारात्मक बाब म्हणजे, भारत जगामध्ये आत्मविश्वासी आणि आत्मनिर्भर राष्ट्र म्हणून आपली प्रतिमा अधिक मजबूत करेल. जागतिक स्तरावर भारताची क्षमता आणि कूटनीतिक धोरणे प्रभावी ठरतील.

टीप : सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित आहे.

















