Rahul Gandhi : "भ्रष्ट जनता पार्टीच्या डबल इंजिन सरकारनी जनतेचं आयुष्य उद्ध्वस्त केलं"; राहुल गांधींचं टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 11:21 IST2026-01-09T11:19:45+5:302026-01-09T11:21:12+5:30
Congress Rahul Gandhi And BJP : राहुल गांधी यांनी भाजपाच्या 'डबल इंजिन' सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

Rahul Gandhi : "भ्रष्ट जनता पार्टीच्या डबल इंजिन सरकारनी जनतेचं आयुष्य उद्ध्वस्त केलं"; राहुल गांधींचं टीकास्त्र
भाजपा आणि काँग्रेसमध्ये कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून नेहमीच संघर्ष पाहायला मिळतो. दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत असतात. याच दरम्यान राहुल गांधी यांनी भाजपाच्या 'डबल इंजिन' सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. "देशभरातील 'भ्रष्ट' जनता पार्टीच्या डबल इंजिन सरकारनी जनतेचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे" असं त्यांनी म्हटलं आहे.
"भ्रष्टाचारासोबतच सत्तेचा दुरुपयोग आणि अहंकाराचे विष भाजपाच्या राजकारणात वरपासून खालपर्यंत पसरलं आहे. त्यांच्या व्यवस्थेत गरीब, असहाय, मजूर आणि मध्यमवर्गीयांचे आयुष्य हे केवळ एक 'आकडा' बनलं आहे. 'विकासाच्या' नावाखाली केवळ वसुलीचे तंत्र सुरू आहे" असं ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
उत्तराखंडमधील अंकिता भंडारी प्रकरणाचा उल्लेख करत ते म्हणाले, "अंकिता भंडारीच्या निर्घृण हत्येने संपूर्ण देश हादरला, पण प्रश्न आजही तोच आहे - सत्तेचे संरक्षण कोणत्या 'व्हीआयपी'ला वाचवत आहे? कायदा सर्वांसाठी समान कधी होणार?" तसेच उत्तर प्रदेशातील उन्नाव प्रकरणाची आठवण करून देत त्यांनी म्हटलं की, "सत्तेच्या गर्वात गुन्हेगारांना कसं वाचवलं गेलं आणि पीडितेला न्यायासाठी किती मोठी किंमत मोजावी लागली, हे संपूर्ण देशाने पाहिलं आहे."
देश भर में “भ्रष्ट” जनता पार्टी की डबल इंजन सरकारों ने जनता की ज़िंदगी तबाह कर दी है।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) January 9, 2026
भ्रष्टाचार के साथ सत्ता का दुरुपयोग और अहंकार का ज़हर BJP की राजनीति में ऊपर से नीचे तक फैल चुका है।
इनके सिस्टम में गरीब, असहाय, मज़दूर और मध्यमवर्ग की ज़िंदगी सिर्फ़ आंकड़ा है और “विकास” के…
इंदूरमधील दूषित पाण्याच्या मुद्द्यावरूनही राहुल गांधी यांनी सरकारला घेरलं. "इंदूरमध्ये विषारी पाणी प्यायल्यामुळे होणारे मृत्यू असोत किंवा गुजरात, हरियाणा आणि दिल्लीतील दूषित पाणीपुरवठ्याच्या तक्रारी असोत; सर्वत्र आजारांची भीती पसरली आहे. राजस्थानची अरावली पर्वतश्रेणी असो किंवा नैसर्गिक संसाधने - जिथे जिथे अब्जाधीशांचा लोभ आणि स्वार्थ पोहोचला, तिथे नियमांची पायमल्ली झाली. डोंगर कापले जात आहेत, जंगलं उद्ध्वस्त केली जात आहेत आणि बदल्यात जनतेला केवळ धूळ, प्रदूषण आणि आपत्ती मिळत आहे" अशी टीका त्यांनी केली.
आरोग्य आणि पायाभूत सुविधांच्या दुरवस्थेवर बोट ठेवत राहुल गांधी पुढे म्हणाले, "खोकल्याच्या सिरपमुळे मुलांचा होणारा मृत्यू, सरकारी रुग्णालयांत नवजात बालकांना कुरतडणारे उंदीर किंवा सरकारी शाळांची कोसळणारी छते - हा निव्वळ 'बेजबाबदारपणा' नसून भ्रष्टाचाराचा थेट फटका आहे. पूल कोसळतात, रस्ते खचतात, रेल्वे अपघातात संपूर्ण कुटुंबे संपतात, पण भाजप सरकार दरवेळी तेच करते - फोटो, ट्विट आणि मदतीची औपचारिकता." शेवटी त्यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत म्हटलं की, "मोदीजींचं 'डबल इंजिन' फक्त अब्जाधीशांसाठी धावत आहे. सामान्य भारतीयासाठी हे भ्रष्टाचारी डबल इंजिन सरकार म्हणजे विकास नसून विनाशाचा वेग आहे, जो दररोज कोणा ना कोणाचे आयुष्य चिरडत आहे."