तस्करांना दणका! सेलू पोलिसांच्या धडक कारवाईत ४५ बैलांची सुटका, ५५ लाखांचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 14:11 IST2026-04-17T14:09:53+5:302026-04-17T14:11:05+5:30
पारडगाव ते परभणी तस्करीचा कट उधळला! ८ वाहनांमध्ये कोंबले होते ४५ बैल; सेलू पोलिसांची मोठी कामगिरी

तस्करांना दणका! सेलू पोलिसांच्या धडक कारवाईत ४५ बैलांची सुटका, ५५ लाखांचा मुद्देमाल जप्त
सेलू (परभणी): शहरातील रायगड कॉर्नर परिसरात अवैध गोवंश वाहतूक करणाऱ्या ७ पिकअप आणि १ आयशर वाहनांवर सेलू पोलिसांनी गुरुवारी रात्री धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी ४५ बैल आणि ८ वाहने असा एकूण ५५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी ११ जणांना अटक केली असून त्यांच्यावर तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अशी झाली कारवाई
जालना जिल्ह्यातील पारडगाव (ता. परतूर) येथून ही जनावरे ८ वाहनांमध्ये क्रूरतेने कोंबून परभणीकडे नेली जात होती. रायगड कॉर्नरवर गस्तीवर असलेल्या पोलिसांनी संशयावरून ही वाहने अडवली. तपासणी केली असता जनावरांच्या वाहतुकीबाबत कोणतेही कायदेशीर कागदपत्रे चालकांकडे आढळले नाहीत. मोटर वाहन कायदा आणि प्राणी छळ प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी सर्व वाहने पोलीस ठाण्यात लावली.
११ आरोपी जेरबंद
पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. जप्त केलेले ४५ बैल जिंतूर तालुक्यातील इटोली येथील गोशाळेत सुरक्षितरीत्या पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणात जलाल अब्दुल कुरेशी, मोहम्मद रहेमान, मोहम्मद समीर यांच्यासह एकूण ११ जणांना अटक करण्यात आली आहे.