परभणीत उभ्या टेम्पोला भीषण आग! आत बांधलेली ३ जनावरे जागीच होरपळून दगावली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 20:00 IST2026-05-16T19:56:57+5:302026-05-16T20:00:13+5:30
खंडोबा बाजार परिसरातील मोकळ्या मैदानात उभ्या असलेल्या टेम्पोने अचानक घेतला पेट

परभणीत उभ्या टेम्पोला भीषण आग! आत बांधलेली ३ जनावरे जागीच होरपळून दगावली
परभणी : शहरातील खंडोबा बाजार भागात मोकळ्या मैदानात उभ्या असलेल्या टेम्पोला अचानक आग लागल्याची घटना शनिवारी दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. आगीत टेम्पोमध्ये बांधलेली तीन जनावरे आगीत होरपळून दगावली. ही आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र स्पष्ट झाले नाही.
खंडोबा बाजार परिसरात गुरांचा आठवडी बाजार भरतो. याशिवाय परिसरात जनावरांसाठी लागणारे चारा आणि इतर साहित्य देखील दररोज विक्री होते. याच मैदानाच्या परिसरात पाण्याच्या टाकीला लागून संरक्षक भिंतीजवळ (एमएच ०१ केयु ६५६५) क्रमांकाचे आयशर टेम्पो वाहन उभे होते. या वाहनात म्हशीचे तीन वघारू बांधलेले होते. शनिवारी दुपारी दोन ते अडीच वाजेच्या दरम्यान अचानक टेम्पोला आग लागली. या घटनेची माहिती नगरसेवक गुलमीर खान यांनी अग्निशमन विभागाला दिली.
मनपा अग्निशमन विभागाचे प्रभारी अग्निशमन अधिकारी दीपक कानोडे, रोहित गायकवाड, उमेश कदम, वाहन चालक संतोष मुदीराज यांनी घटनास्थळ गाठले. ही आग मोठ्या प्रमाणात पसरली होती. आग आटोक्यात आणण्यासाठी यंत्रणेने शर्तीचे प्रयत्न केले. मात्र, या घटनेत म्हशीचे तीन वघारू जागेवर आगीमुळे होपळून मयत झाले. या घटनेची कोणतीही नोंद पोलिस ठाण्यात झाली नव्हती. ही आग नेमकी कशामुळे लागली तसेच संबंधित वाहनाचा चालक घटनास्थळी उपस्थित नव्हता. आगीच्या घटनेनंतर परिसरात नागरिक, बघ्यांची गर्दी झाली होती.