विहिरीत तरंगत होता चिमुकलीचा मृतदेह, माताच निघाली आरोपी; न्यायालयात जन्मठेपेची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 19:02 IST2026-04-15T19:01:19+5:302026-04-15T19:02:17+5:30

पोटच्या गोळ्याचा जीव घेणाऱ्या आईला मरेपर्यंत कारावास; पालममधील त्या दुर्दैवी घटनेचा निकाल लागला.

Parbhani: Mother Sentenced to Life Imprisonment for Killing Her 6-Month-Old Daughter. | विहिरीत तरंगत होता चिमुकलीचा मृतदेह, माताच निघाली आरोपी; न्यायालयात जन्मठेपेची शिक्षा

विहिरीत तरंगत होता चिमुकलीचा मृतदेह, माताच निघाली आरोपी; न्यायालयात जन्मठेपेची शिक्षा

परभणी : पालम तालुक्यातील पुयणी येथे आपल्या ६ ते ८ महिन्यांच्या मुलीला विहिरीत फेकून तिचा खून करणाऱ्या आईला गंगाखेड येथील अपर सत्र न्यायाधीश-१ डी. डी. कुरूलकर यांनी जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावली.

२६ ऑक्टोबर २०२२ रोजी नगरपंचायत पालम येथील पाणीपुरवठा लिपिक सय्यद हुसैन कासीम हे पंप बिघडल्याने विहिरीवर गेले होते. त्यावेळी त्यांना विहिरीच्या पाण्यावर एका बालिकेचा मृतदेह तरंगताना दिसला. त्यांनी ही बाब तत्काळ पालम पोलिसांना कळविली. या प्रकरणात पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ३०२ व २०१ अन्वये गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास फौजदार एम. यू. कारवार यांच्याकडे सोपविण्यात आला होता. त्यांनी या गुन्ह्याची उकल केली. आरोपी शामला गंगाधर जाधव हिने आपल्या पोटच्या मुलीला जिवंत असताना विहिरीत फेकून दिल्याचे समोर आले. यानंतर तिच्याविरुद्ध गंगाखेड येथील न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले. या खटल्यात सरकार पक्षातर्फे ९ साक्षीदार तपासण्यात आले. तर बचाव पक्षातर्फे ४ साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादीचा जबाब, परिस्थितीजन्य साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष यात महत्त्वाची ठरली.

न्यायाधीश कुरूलकर यांनी सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून शामला गंगाधर जाधव हिला भादंविच्या कलम ३०२ अन्वये सश्रम जन्मठेप व एक हजार रुपये दंड तसेच कलम २०१ अन्वये ३ वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दोन्ही शिक्षा एकत्रित भोगण्याचे आदेश दिले. या प्रकरणात सहायक सरकारी अभियोक्ता एस. वाय. पौळ यांनी युक्तिवाद केला. तर कोर्ट पैरवी म्हणून अंमलदार एल. व्ही. मुंढे, जे. एच. पठाण व एम. डी. कुंडगीर यांनी काम पाहिले.

Web Title : माँ को बच्ची को कुएं में डुबोने के लिए आजीवन कारावास।

Web Summary : परभणी के पालम में, एक महिला को अपनी बच्ची को कुएं में फेंककर हत्या करने के आरोप में आजीवन कारावास की सजा सुनाई गई। अदालत ने सबूतों और गवाहों के बयानों के आधार पर उसे दोषी पाया।

Web Title : Mother sentenced to life for drowning baby in well.

Web Summary : In Palam, a woman received a life sentence for murdering her infant daughter by throwing her into a well. The court found her guilty based on evidence and witness testimonies.