पुलाच्या कामाचा अंदाज न आल्याने घात, कार उलटून तरुण व्यावसायिकाचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2026 11:53 IST2026-05-03T11:52:07+5:302026-05-03T11:53:01+5:30
नांदेडकडे जाताना मध्यरात्री काळाने घातली झडप, धीरज जगलपुरे यांच्या निधनाने गंगाखेड शहरात हळहळ.

पुलाच्या कामाचा अंदाज न आल्याने घात, कार उलटून तरुण व्यावसायिकाचा जागीच मृत्यू
गंगाखेड (जि. परभणी): गंगाखेड शहरातील 'धीरज मोटर्स'चे मालक धीरज बालासाहेब जगलपुरे (३८) यांचा रविवारी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. गंगाखेड-लोहा राज्य महामार्गावरील मालेवाडी पाटीजवळ त्यांची कार पलटी झाल्याने ही घटना घडली.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, धीरज जगलपुरे हे आपल्या क्रेटा कारने (MH 43 BY 3555) गंगाखेडकडून नांदेडच्या दिशेने जात होते. मालेवाडी पाटीजवळ सध्या पुलाचे काम सुरू आहे. मध्यरात्रीच्या अंधारात पुलाजवळील वळणाचा अंदाज न आल्याने त्यांची कार वेगाने पलटी झाली. धीरज स्वतः कार चालवत होते.
उपचारापूर्वीच प्राणज्योत मालवली
अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेत जगलपुरे यांना तातडीने गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. सोमवारी सकाळी शवविच्छेदन करून पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले आणि भाऊ-भावजय असा मोठा परिवार आहे.