प्रदूषण कमी होताच वाढणार सूर्याची दाहकता
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 13:26 IST2026-04-22T13:24:53+5:302026-04-22T13:26:03+5:30
जागतिक स्तरावर सरासरी तापमानात १.४ अंश सेल्सिअसने वाढ झाली असताना भारतात हे प्रमाण केवळ ०.८८ अंश इतकेच राहिले आहे. ही बातमी वरवर पाहता दिलासादायक वाटत असली तरी त्यामागील वास्तव अत्यंत भयावह आहे.

प्रदूषण कमी होताच वाढणार सूर्याची दाहकता
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : जागतिक स्तरावर सरासरी तापमानात १.४ अंश सेल्सिअसने वाढ झाली असताना भारतात हे प्रमाण केवळ ०.८८ अंश इतकेच राहिले आहे. ही बातमी वरवर पाहता दिलासादायक वाटत असली तरी त्यामागील वास्तव अत्यंत भयावह आहे. हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या सालाटा इन्स्टिट्यूटने केलेल्या नवीन संशोधनानुसार, भारतात तापमानाचा वेग कमी असण्याचे कारण ‘नैसर्गिक’ नसून ते वाढत्या ‘प्रदूषणाचे’ फलित आहे. प्रदूषणामुळे निर्माण झालेला हवेतील कणांचा थर सूर्याची किरणे शोषून घेतो किंवा अवकाशात परावर्तित करतो, ज्याला ‘रेडिएटिव्ह मास्क’ म्हटले जाते. मात्र, जसे जसे प्रदूषण कमी होईल, तसा हा संरक्षक कवच हटून हवामानात अचानक उष्णतेचा मोठा स्फोट होऊ शकतो.
भारत सरकारच्या ‘नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम’अंतर्गत जेव्हा हवा स्वच्छ होईल, तेव्हा उत्तर भारतात विशेषतः हिवाळ्यानंतर तापमानात मोठी वाढ पाहायला मिळू शकते. एका अंदाजानुसार, २०३० पर्यंत देशातील सुमारे २० कोटी लोकांना भीषण उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागेल. त्यामुळे निकट भविष्यात ‘प्रचंड उष्णतेच्या लाटे’पासून वाचण्यासाठी आतापासूनच तयारी करणे हाच एकमेव पर्याय उरला आहे.
श्रमिकांवर होणार परिणाम
वाढत्या उष्णतेचा सर्वाधिक फटका देशाच्या श्रमशक्तीला बसणार आहे. भारतातील जवळपास ७५ टक्के वर्कफोर्स म्हणजेच ३८ कोटी लोक शेती व बांधकामायांसारख्या मोकळ्या वातावरणातील कामांवर असतात. भीषण उष्णतेमुळे कामाचे तास कमी होतील, ज्याचा थेट परिणाम देशाच्या एकूण जीडीपीवर होण्याची शक्यता आहे.
पाऊस ठरणार नवे आव्हान
केवळ तापमानच नव्हे, तर पावसाचे स्वरूपही बदलणार आहे. या शतकाच्या अखेरीस पावसाच्या प्रमाणात २० टक्के ते ६० टक्के वाढ संभवते.
शेतकऱ्यांसाठी हे मोठे आव्हान असेल. शेतीमध्ये वाढणाऱ्या सिंचनामुळे जमिनीचा पृष्ठभाग थंड राहण्यास मदत होत असली, तरी हवामान बदलाचे हे चक्र येणाऱ्या काळात अधिक आव्हानात्मक ठरणार आहे.