खळबळजनक! उलट्या, पोटदुखी अन्... मध्यान्ह भोजनानंतर ७० हून अधिक मुलांची प्रकृती बिघडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 17:30 IST2026-02-07T17:29:46+5:302026-02-07T17:30:38+5:30
जेवणानंतर काही वेळातच मुलांना उलट्या, पोटदुखी आणि अस्वस्थता जाणवू लागली.

खळबळजनक! उलट्या, पोटदुखी अन्... मध्यान्ह भोजनानंतर ७० हून अधिक मुलांची प्रकृती बिघडली
बिहारच्या मधेपुरा जिल्ह्यात मध्यान्ह भोजनानंतर मोठी खळबळ उडाली आहे. शाळेत शनिवारी जेवल्यानंतर ७० हून अधिक मुलांची प्रकृती अचानक बिघडली. जेवणानंतर काही वेळातच मुलांना उलट्या, पोटदुखी आणि अस्वस्थता जाणवू लागली. मुलांची प्रकृती बिघडत असल्याचं पाहून शाळा परिसरात एकच गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले.
शिक्षकांनी तातडीने याची माहिती स्थानिक प्रशासन आणि आरोग्य विभागाला दिली. मिळालेल्या माहितीनुसार, माध्यान्ह भोजनात पाल पडल्याची शक्यता वर्तवली जात आहे, ज्यामुळे मुलांची प्रकृती बिघडली. मात्र याला अधिकृत दुजोरा तपासणीनंतरच मिळू शकेल. आजारी मुलांना रुग्णवाहिका आणि खाजगी वाहनांच्या मदतीने मधेपुरा सदर रुग्णालयात नेण्यात आले.
रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांच्या पथकाने मुलांवर उपचार सुरू केले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, बहुतांश मुलांची प्रकृती आता स्थिर असून ते धोक्याबाहेर आहेत. मात्र, उपचारादरम्यान एका मुलीची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत असून तिला विशेष निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. रुग्णालयात मुलांच्या पालकांनीही मोठी गर्दी केली होती, ज्यामुळे तिथे चिंतेचे वातावरण पाहायला मिळाले.
मिळालेल्या माहितीनुसार, शाळेत मध्यान्ह भोजन एका एनजीओजच्या माध्यमातून पुरवण्यात आलं होतं. जेवण वाटप केल्यानंतर लगेचच मुलांमध्ये आजारपणाची लक्षणं दिसू लागली. या घटनेने पुन्हा एकदा मध्यान्ह भोजनाचा दर्जा आणि देखरेख यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मुलांची बिघडलेली प्रकृती पाहून शाळा प्रशासनाने तातडीने जेवण वाटप थांबवलं आणि उर्वरित अन्न तपासणीसाठी बाजूला ठेवलं.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा शिक्षण अधिकारी (DEO) संजय कुमार यांनी सदर रुग्णालयात पोहोचून मुलांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांनी सांगितलं की, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं की, जर तपासात निष्काळजीपणा समोर आला तर जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल. सध्या प्रशासनाचं प्राधान्य सर्व मुलांवर योग्य उपचार करणं आणि त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवणं हे आहे.