जम्मू - जम्मू-काश्मीरमधील रामबन येथे शनिवारी बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 20 जणांचा मृत्यू झाला असून, 13 जण जखमी झाले आहेत. श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गावरून बनिहालहून रामबनच्या दिशेने जात असलेली ही बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने केलामोठ येथे दरीत कोसळली. घटनास्थळी पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू केले. तसेच जखमींनां उधमपूर येथील सैनिकी रुग्णालयात दाखल केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जेके 19, 1593 या क्रमांकाची ही मिनिबस बनिहाल येथून रामबनच्या दिशेने जात होती. या बसमधून एकूण 32 प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, केला मोठ भागात या बसला अपघात झाला. तेथे उपस्थित असलेल्या स्थानिक नागरिकांनी अपघाताची माहिती तातडीने पोलिसांना दिली. त्यानंतर जवानांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्यास सुरुवात केली.