पश्चिम आशियातील वाढता तणाव, रुपयावर असलेला दबाव आणि कच्च्या तेलाच्या किमतींमधील प्रचंड वाढ यामुळे भारतीय शेअर बाजारात सध्या मोठी पडझड पाहायला मिळत आहे. या पडझडीमुळे या वर्षात आतापर्यंत सेन्सेक्स सुमारे १२ टक्के आणि निफ्टी जवळपास १० टक्के खाली व्यवहार करत आहेत. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी बाजारात सातत्याने विक्रीचा सपाटा लावला आहे. या सर्व संकटमय वातावरणात आता भारतीय गुंतवणूकदारांची झोप उडवणारी एक अत्यंत धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
जागतिक पातळीवर वाढती अनिश्चितता आणि परदेशी गुंतवणूकदारांचे भारतीय बाजारातून काढते पाय यामुळे देशातील सर्वात मोठ्या कॉर्पोरेट ब्रँड्सचे मूल्य आंतरराष्ट्रीय स्तरावर घसरले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आणि शेअर बाजाराच्या दृष्टीने हा काळ अत्यंत आव्हानात्मक मानला जात आहे. ब्लूमबर्गच्या ताज्या आकडेवारीनुसार, मार्केट कॅपिटलायझेशनच्या आधारावर जगातील पहिल्या १०० आघाडीच्या कंपन्यांमध्ये आता एकही भारतीय कंपनी राहिलेली नाही. विशेष म्हणजे, २०२५ च्या सुरुवातीला भारताच्या तीन बलाढ्य कंपन्या या यादीत मानाच्या स्थानावर होत्या, मात्र आता त्या या यादीतून पूर्णपणे बाहेर पडल्या आहेत.
भारतीय कंपन्यांची जागतिक घसरण
- भारताची सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज २०२५ च्या सुरुवातीला जागतिक पातळीवर ५७ व्या स्थानावर होती. २०२६ च्या सुरुवातीला ती ७३ व्या स्थानावर घसरली आणि आता थेट १०६ व्या स्थानावर फेकली गेली.
- देशातील सर्वात मौल्यवान खाजगी बँक असलेली एचडीएफसी बँक २०२५ च्या सुरुवातीला ९७ व्या स्थानावर होती, ती आता थेट १९० व्या स्थानावर आली.
- देशातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर निर्यातदार कंपनी टिसीएस २०२५ मध्ये ८४ व्या आणि २०२६ च्या सुरुवातीला १७१ व्या स्थानावर होती. मात्र, आता ती घसरून थेट ३१४ व्या स्थानावर पोहोचली आहे.
परदेशी गुंतवणूकदारांकडून २.२ लाख कोटींचा निधी परत
भारतीय बाजारातील या ऐतिहासिक घसरणीचे मुख्य कारण परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची सातत्यपूर्ण नफेखोरी आणि विक्री हे आहे. बीएसई आणि एनएसडीएलच्या अहवालानुसार, एकट्या २०२६ या वर्षात (जानेवारी ते मे २०२६ दरम्यान) परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून तब्बल २.२० लाख कोटी रुपये काढून घेतले आहेत. यातूनच बाजारातील गंभीर परिस्थिती स्पष्ट होते की, केवळ एप्रिल महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांनी ६० हजार ८४७ कोटी रुपयांचे शेअर्स विकले. तर, चालू मे महिन्यात आतापर्यंत २७ हजार ०४८ कोटी रुपयांची विक्री झाली आहे.
Web Summary : Indian stock market faces turmoil as RIL, HDFC, and TCS exit the world's top 100 companies amid global uncertainty and foreign investor sell-offs. Sensex and Nifty decline sharply, with significant capital outflow.
Web Summary : वैश्विक अनिश्चितता और विदेशी निवेशकों की बिकवाली के बीच भारतीय शेयर बाजार में गिरावट आई है। RIL, HDFC और TCS दुनिया की टॉप 100 कंपनियों से बाहर हो गई हैं। सेंसेक्स और निफ्टी में भारी गिरावट।