खऱ्या आयुष्यातील 'लेडी सिंघम'! मध्यरात्री बसस्टॉपवर उभं राहून छेडछाड करणाऱ्या ४० जणांना पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 17:20 IST2026-05-06T17:15:56+5:302026-05-06T17:20:35+5:30

तेलंगणामध्ये महिला पोलीस अधिकाऱ्याने केलेल्या धाडसी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Hyderabad Police Commissioner Detains 40 Harassers After Posing as Civilian During Midnight Undercover Operation | खऱ्या आयुष्यातील 'लेडी सिंघम'! मध्यरात्री बसस्टॉपवर उभं राहून छेडछाड करणाऱ्या ४० जणांना पकडले

खऱ्या आयुष्यातील 'लेडी सिंघम'! मध्यरात्री बसस्टॉपवर उभं राहून छेडछाड करणाऱ्या ४० जणांना पकडले

Lady Singham B. Sumathi: एकीकडे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असताना, हैदराबादमधील मलकाजगिरी विभागाच्या नवनियुक्त पोलीस आयुक्त बी. सुमती यांनी एक असे धाडसी पाऊल उचलले ज्याचे देशभर कौतुक होत आहे. रात्रीच्या वेळी महिलांना रस्त्यावरून चालताना किंवा बसची वाट पाहताना कोणत्या त्रासाला सामोरे जावे लागते, याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी महिला पोलीस आयुक्त स्वतः मध्यरात्री साध्या वेशात रस्त्यावर उतरल्या होत्या. यादरम्यान त्यांनी तब्बल ४० टवाळखोरांना रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

मध्यरात्री १२:३० ते ३:३० चा थरार

दिलसुखनगर परिसरातून महिलांच्या छेडछाडीबाबत अनेक तक्रारी मिळत होत्या. १ मे रोजी पदभार स्वीकारलेल्या बी. सुमती यांनी या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून स्वतः मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. त्या कोणत्याही सुरक्षेशिवाय आणि पोलीस ताफ्याशिवाय एका सामान्य महिलेप्रमाणे दिलसुखनगर येथील बस स्टॉपवर मध्यरात्री साडेबारा वाजता उभ्या राहिल्या.

पुढील तीन तासांत जे घडले ते अत्यंत धक्कादायक होते. त्या पोलीस अधिकारी आहेत याची पुसटशीही कल्पना नसलेले अनेक तरुण आणि नोकरदार पुरुष त्यांच्याजवळ आले. काही जणांनी बाईकवरून जाताना त्यांना पाहून शिट्ट्या वाजवल्या आणि अश्लील शेरेबाजी केली. अनेक जण दारूच्या नशेत होते, तर काही जणांनी गांजा प्यायल्याचा संशय होता. काही जणांनी त्यांच्याजवळ येऊन अत्यंत आक्षेपार्ह आणि अपमानजनक प्रश्न विचारण्यास सुरुवात केली.

बी. सुमती जरी एकट्या दिसत होत्या, तरी काही अंतरावर साध्या वेशात त्यांचे पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. जसा छेडछाडीचा प्रकार वाढला, तसा आयुक्तांनी इशारा दिला आणि दबा धरून बसलेल्या पोलिसांनी ४० जणांना जाळ्यात पकडले.

तुरुंगाऐवजी समुपदेशनाचा मार्ग

अटक करण्यात आलेल्यांमध्ये प्रामुख्याने विद्यार्थी आणि काही कर्मचाऱ्यांचा समावेश होता. पोलिसांनी या सर्वांवर तातडीने कठोर गुन्हे दाखल करण्याऐवजी, त्यांना आणि त्यांच्या पालकांना बोलावून कडक शब्दांत ताकीद दिली आणि त्यांचे समुपदेशन केले. महिलांशी सार्वजनिक ठिकाणी कसे वागावे, याबाबत त्यांना धडा शिकवण्यात आला.

२५ वर्षांपूर्वीही केली होती अशीच कामगिरी

बी. सुमती यांच्यासाठी हे पहिलेच ऑपरेशन नव्हते. सुमारे २५ वर्षांपूर्वी, जेव्हा त्यांनी करीमनगर येथे पोलीस उपअधीक्षक म्हणून करिअरची सुरुवात केली होती, तेव्हा काझीपेठ रेल्वे स्थानकावर त्यांनी अशाच प्रकारचे धाडसी ऑपरेशन केले होते. बी. सुमती या तेलंगणा केडरच्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी असून त्यांनी यापूर्वी राज्य गुप्तचर विभागात प्रमुख म्हणून काम केले आहे. तसेच अनेक माओवाद्यांच्या आत्मसमर्पणात त्यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे.

नेटकऱ्यांनी दिले 'लेडी सिंघम' नाव

या धाडसी कामगिरीनंतर सोशल मीडियावर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. नेटकऱ्यांनी त्यांना खऱ्या आयुष्यातील लेडी सिंघम असे नाव दिले आहे. फक्त एसी केबिनमध्ये बसून अहवाल वाचण्यापेक्षा, जमिनीवरील वास्तव जाणून घेण्यासाठी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरणाऱ्या अशा अधिकाऱ्याची आज देशाला गरज आहे, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.

Web Title : असली 'लेडी सिंघम' ने आधी रात बस स्टॉप पर 40 छेड़छाड़ करने वाले पकड़े।

Web Summary : हैदराबाद की डीसीपी सुमति ने भेस बदलकर बस स्टॉप पर 40 छेड़छाड़ करने वालों को पकड़ा। उत्पीड़न की शिकायतों के बाद उन्होंने यह साहसी कदम उठाया। जेल की बजाय, अपराधियों को परामर्श मिला, जिससे सार्वजनिक व्यवहार में सम्मान की आवश्यकता उजागर हुई। 25 साल पहले भी ऐसा ही ऑपरेशन किया था, जिससे उन्हें 'लेडी सिंघम' की प्रशंसा मिली।

Web Title : Real-life 'Lady Singham' nabs 40 harassers at midnight bus stop.

Web Summary : Hyderabad's DCP Sumathi, disguised, caught 40 harassers at a bus stop. Complaints of harassment led her to this daring act. Instead of jail, offenders received counseling, highlighting the need for respectful public behavior. This echoes a similar operation 25 years prior, earning her 'Lady Singham' praise.