आजच्या काळात वॉशिंग मशीन ही प्रत्येक घराची गरज बनली आहे. यामुळे वेळेची बचत होते आणि मेहनतही कमी लागते. मात्र अनेक लोक घाईघाईत कपडे धुताना अशी एक छोटी चूक करतात, ज्याचा थेट परिणाम कपड्यांवर होतो. तुम्हीही पाहिलं असेल की काही कपडे अवघ्या काही महिन्यांतच खराब होतात, ते सैल होतात किंवा कापड खरखरीत वाटू लागतं, कपड्याची चमक जाते.
लोक अनेकदा यासाठी डिटर्जेंट किंवा मशीनला दोष देतात, पण खरं कारण काही वेगळंच असतं. वॉशिंग मशीनमध्ये गरजेपेक्षा जास्त कपडे भरणं ही सर्वात मोठी चूक मानली जाते. तुमची हीच एक सवय हळूहळू तुमच्या महागड्या कपड्यांचं नुकसान करते. जर तुम्हाला तुमचे कपडे बराच काळ नव्यासारखे दिसावेत असं वाटत असेल, तर ही चूक समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे.
मशीनमध्ये जास्त कपडे भरणं का चुकीचं?
एकाच वेळी जास्त कपडे धुतल्याने वीज आणि वेळ वाचेल, असा विचार अनेकजण करतात. पण असं केल्याने कपडे नीट स्वच्छ होत नाहीत. जेव्हा मशीनमध्ये जास्त कपडे भरले जातात, तेव्हा त्यांना फिरण्यासाठी पुरेशी जागा मिळत नाही. परिणामी कपड्यांवर कपडे जास्त घासले जातात आणि कापड लवकर कमकुवत होऊ लागतं. इतकंच नाही तर, ओव्हरलोडिंगमुळे मशीनच्या मोटर आणि ड्रमवरही ताण पडतो, ज्यामुळे मशीन लवकर खराब होऊ शकते.
कपड्यांची चमक का जाते?
जेव्हा कपडे गरजेपेक्षा जास्त भरलेले असतात, तेव्हा डिटर्जेंट पाण्यात नीट विरघळत नाही. त्याचे अवशेष कपड्यांवरच राहतात. यामुळेच काही दिवसांनंतर कपडे निस्तेज आणि जुने दिसू लागतात. विशेषतः काळ्या, निळ्या आणि गडद रंगाच्या कपड्यांवर याचा परिणाम लवकर दिसून येतो. वारंवार घर्षण झाल्यामुळे कपड्यांचा रंग उडू लागतो.
कोणते कपडे सर्वात आधी खराब होतात?
नाजूक कापड असलेले कपडे ओव्हरलोडिंगमुळे सर्वाधिक प्रभावित होतात.
कॉटन टी-शर्ट
जिम वेअर
सिल्क किंवा रेयॉन
लोकरीचे कपडे
लहान मुलांचे कपडे
कपडे धुण्याची योग्य पद्धत काय?
वॉशिंग मशीनचा ड्रम कधीही पूर्ण भरू नये. त्यात साधारण ७० ते ७५ टक्क्यांपर्यंतच कपडे टाकावेत. यामुळे कपड्यांना फिरण्यासाठी जागा मिळते आणि ते अधिक चांगल्या प्रकारे स्वच्छ होतात.
या गोष्टींचीही काळजी घ्या
जड आणि हलके कपडे वेगवेगळे धुवा.
जास्त प्रमाणात डिटर्जेंट वापरू नका.
कपड्यांच्या टॅगवर दिलेल्या सूचना नक्की वाचा.
नाजूक कपड्यांसाठी 'जेंटल' किंवा 'डेलिकेट' मोड निवडा.
खूप घाणेरडे कपडे आधी हाताने थोडे स्वच्छ करून मगच मशीनमध्ये टाका.
एक छोटीशी खबरदारी तुमच्या कपडे चांगले ठेवू शकते. जर तुम्हाला तुमचे कपडे दीर्घकाळ टिकवायचे असतील, तर वॉशिंग मशीन ओव्हरलोड करण्याची चूक कधीही करू नका.
