Ahilyangar: "घर बांधण्यासाठी माहेरहून ४ लाख रुपये आण" सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेचं टोकाचं पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 17:05 IST2026-05-06T17:02:45+5:302026-05-06T17:05:00+5:30
Ahilyanagar Ekrukhe Suicide News: हुंड्यासाठी सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या सततच्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून एका २३ वर्षीय नवविवाहितेने आत्महत्या केली.

Ahilyangar: "घर बांधण्यासाठी माहेरहून ४ लाख रुपये आण" सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेचं टोकाचं पाऊल
अहिल्यानगरमधील एकरुखे येथून अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली. हुंड्यासाठी सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या सततच्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून एका २३ वर्षीय नवविवाहितेने विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. याप्रकरणी मृत महिलेच्या पतीसह सासू-सासऱ्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
प्रिया ढगणी असे मृत महिलेचे नाव असून, मिळालेल्या माहितीनुसार, प्रिया यांचा विवाह झाल्यानंतर काही काळापासूनच सासरच्या मंडळींनी त्यांच्याकडे पैशांची मागणी सुरू केली. "घर बांधण्यासाठी माहेरहून ४ लाख रुपये घेऊन ये," असा तगादा पती आणि सासू-सासऱ्यांनी लावला. ही मागणी पूर्ण होत नसल्याने गेल्या दोन वर्षांपासून प्रिया यांचा छळ केला जायचा. यादरम्यान, तिला वारंवार मारहाण आणि उपाशी ठेवण्यात आले. नुकतेच सासरच्या लोकांनी प्रिया यांना पुन्हा एकदा बेदम मारहाण केल्यानंतर ती आपल्या माहेरी निघून आली आणि घराजवळील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
पतीसह सासू-सासऱ्याला अटक
प्रिया यांच्या निधनानंतर त्यांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करत पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून, प्रियाच्या पतीसह सासू-सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
अहिल्यानगर: हुंड्यासाठी डॉक्टर सुनेचा छळ
अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेरमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली. फ्लॅट घेण्यासाठी माहेरून १२ लाख रुपये आणण्यासाठी सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या सततच्या छळाला कंटाळून एका २६ वर्षीय तरुण महिला डॉक्टरने आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना पारनेर तालुक्यात शनिवारी घडली. एका सुशिक्षित महिलेला अशा प्रकारे टोकाचा निर्णय घ्यावा लागणे, हे समाजासाठी शरमेची बाब आहे. या प्रकरणी पोलीस आता काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.