तरुणावर मगरीचा जीवघेणा हल्ला; १२ फूट लांब मगर मृतदेहाला जबड्यात धरून तासनतास पाण्यात फिरत होती
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 19:46 IST2026-05-08T19:32:27+5:302026-05-08T19:46:58+5:30
पाणी पिण्यासाठी गेलेल्या तरुणावर १२ फुटी लांब मगरीने हल्ला करुन त्याला ठार मारले.

तरुणावर मगरीचा जीवघेणा हल्ला; १२ फूट लांब मगर मृतदेहाला जबड्यात धरून तासनतास पाण्यात फिरत होती
Vadodara Crocodile Attack: गुजरातच्या वडोदरा जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. वाघोडिया तालुक्यातील कागडीपुरा गावात एका विशालकाय मगरीने २२ वर्षीय तरुणाला ओढून खोल पाण्यात नेले आणि त्याला ठार केले. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, मगरीने तरुणाचा मृतदेह जबड्यात पकडून तासनतास पाण्यात फिरवल्याचे विदारक दृश्य पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मिथुन महेशभाई वसावा (वय २२) हा तरुण आपल्या मजुरीतून घराचा गाडा चालवत होता. गुरुवारी दुपारी तो देव नदीच्या काठावर गुरे चरण्यासाठी गेला होता. दुपारी तहान लागल्याने तो नदीकाठी पाणी पिण्यासाठी वाकला असता, पाण्यात दबा धरून बसलेल्या सुमारे १२ फूट लांब मगरीने अचानक त्याच्यावर झडप घातली. मगरीने जबड्यात मिथुनची कंबर पकडली आणि काही क्षणातच त्याला खोल पाण्यात ओढून नेले.
तासनतास मृतदेह जबड्यात
ही घटना इतकी भयानक होती की, नदीकाठावर उभ्या असलेल्या प्रत्यक्षदर्शनींनी आरडाओरडा केला, मात्र कोणीही काही करू शकले नाही. ती अजस्त्र मगर शिकार केलेल्या तरुणाचा मृतदेह तोंडात धरून अनेक तास नदीच्या पात्रात इकडून तिकडे पोहत होती. या घटनेने संपूर्ण गावात भीतीचे आणि दहशतीचे वातावरण पसरले आहे.
कुटुंबाचा आधार गेला
मृत मिथुन हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. आपल्या वृद्ध आई-वडिलांचा तो एकमेव आधार होता. तो मजुरी करून कुटुंबाचे पालनपोषण करायचा. त्याच्या अकाली निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अडथळे आणि प्रशासनावर संताप
घटनेची माहिती मिळताच वाघोडिया पोलीस, वन विभाग आणि अग्निशमन दलाच्या तुकड्या घटनास्थळी पोहोचल्या. मात्र, नदीतील गढूळ पाणी आणि मगरीमुळे शोधकार्यात मोठे अडथळे आले. बचाव पथकाची बोट जवळ येताच मगर मृतदेहासह पाण्यात खोलवर बुडी मारत होती. "जर वेळेत रेस्क्यू ऑपरेशन सुरू झाले असते, तर कदाचित मिथुनचा जीव वाचला असता. वन विभाग आणि पोलिसांना तात्काळ कळवले होते, पण आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून तलाठ्याचा अहवाल आल्याशिवाय काम सुरू होणार नाही, अशा तांत्रिक बाबींमुळे वेळ वाया गेला," असं गावकऱ्यांनी सांगितले.