"फटाके वाजल्यासारखा आवाज आला, पण तो..."; हल्ल्यातून थोडक्यात वाचल्यानंतर फारुख अब्दुल्लांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 13:58 IST2026-03-12T13:48:45+5:302026-03-12T13:58:40+5:30
जम्मूमध्ये फारुख अब्दुल्ला यांच्यावर भर लग्नकार्यात गोळीबार; थोडक्यात बचावले, हल्लेखोर ताब्यात

"फटाके वाजल्यासारखा आवाज आला, पण तो..."; हल्ल्यातून थोडक्यात वाचल्यानंतर फारुख अब्दुल्लांची प्रतिक्रिया
Farooq Abdullah Attack: नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारुख अब्दुल्ला यांच्यावर गुरुवारी एका लग्नसोहळ्यात जीवघेणा हल्ला झाला. गोळीबाराच्या या घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडाली असून, सुदैवाने अब्दुल्ला या हल्ल्यातून थोडक्यात बचावले आहेत. 'काही काळ मला वाटलं की फटाके फुटत आहेत, पण प्रत्यक्षात माझ्यावर गोळ्या झाडल्या जात होत्या. ईश्वरानेच माझे प्राण वाचवले,' अशी पहिली प्रतिक्रिया त्यांनी या घटनेनंतर दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. फारुख अब्दुल्ला आणि उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी हे नॅशनल कॉन्फरन्सच्या एका नेत्याच्या मुलाच्या लग्नासाठी जम्मूमध्ये गेले होते. दोघेही नेते सुमारे एक तास कार्यक्रमस्थळी होते. कार्यक्रम आटोपून बाहेर पडत असताना, कमल सिंह जमवाल (६३ वर्ष) नावाच्या एका व्यक्तीने अब्दुल्ला यांच्या अगदी जवळून पिस्तूल रोखून दोन गोळ्या झाडल्या.
अब्दुल्ला यांच्या सुरक्षा रक्षकांनी प्रसंगावधान राखून तात्काळ त्यांना बाजूला केले आणि हल्लेखोराला जागेवरच झडप घालून ताब्यात घेतले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हल्लेखोर मागून येऊन अब्दुल्ला यांच्यावर बंदूक रोखताना स्पष्ट दिसत आहे.
२० वर्षांपासून फारुख अब्दुल्लांच्या खुनाचा प्रयत्न; हल्लेखोराची कबुली
अटक करण्यात आलेला ६३ वर्षीय कमल सिंह जमवाल हा जम्मूचाच रहिवासी आहे. धक्कादायक बाब म्हणजे, 'मी गेल्या २० वर्षांपासून फारुख अब्दुल्ला यांना मारण्याचा प्रयत्न करत होतो,' अशी कबुली त्याने पोलिसांकडे दिली आहे. दरम्यान, अब्दुल्ला यांनी स्पष्ट केले की, ते या व्यक्तीला ओळखत नाहीत आणि त्याचा हेतू काय होता, याची त्यांना कल्पना नाही.
"मी लग्न समारंभातून बाहेर येत होतो, तेव्हा मला फटाके फुटल्यासारखा आवाज आला. त्याच क्षणी माझ्या सुरक्षा रक्षकांनी मला तातडीने गाडीत बसवले. मला नंतर सांगण्यात आले की, तिथे एका माणसाने पिस्तुल काढून दोन गोळ्या झाडल्या होत्या. मी त्या माणसाला ओळखत नाही आणि त्याच्याबद्दल मला कोणतीही माहिती नाही. हल्लेखोराचा हेतू काय होता किंवा ही सुरक्षेतील चूक होती का, यावर मी आताच काही बोलू शकत नाही. त्याचे काय नियोजन होते हे मला माहित नाही. सुरक्षेत मोठी चूक झाली असे म्हणणे घाईचे ठरेल. त्या लग्नात अनेक मोठी मंडळी उपस्थित होती, पण तिथे पोलीस तैनात नव्हते," असे फारुख अब्दुल्ला म्हणाले.
सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह
झेड प्लस सुरक्षा कवच असलेल्या आणि एनएसजी सुरक्षा असलेल्या नेत्याच्या इतक्या जवळ बंदूकधारी व्यक्ती पोहोचलीच कशी, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
ओमर अब्दुल्ला यांची प्रतिक्रिया
"एखादी व्यक्ती लोड केलेल्या पिस्तूलसह इतक्या जवळ कशी येऊ शकते? हे सुरक्षेचे मोठे अपयश आहे. आमच्याकडे उत्तरांपेक्षा प्रश्नच जास्त आहेत," असे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. दुसरीकडे यावरुन राज्यसभेत या मुद्द्यावरून गदारोळ झाला. सरकारची नेमकी इच्छा काय आहे? त्यांना फारुख अब्दुल्ला यांची हत्या झालेली पाहायची आहे का? असा संतप्त सवाल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला.
अमित शाह यांचा फोन
या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वतः फारुख अब्दुल्ला यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल आणि सुरक्षेतील त्रुटींची तपासणी होईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.