बिहारच्या जमुई जिल्ह्यातील झाझा ब्लॉकमध्ये कार्यरत असलेल्या ग्रामीण कार्य विभागाच्या कार्यकारी अभियंता गोपाल कुमार यांच्या कार्यालय आणि निवासस्थानावर टाकलेल्या छाप्यांमध्ये कोट्यवधी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता सापडली. आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या या कारवाईत रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने, व्यावसायिक मालमत्ता, आलिशान फ्लॅट आणि महागडी वाहने जप्त करण्यात आली असून, कार्यकारी अभियंत्याकडे ऐवढी संपत्ती पाहून अधिकारीही थक्क झाले आहेत.
आर्थिक गुन्हे शाखेने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, गोपाल कुमार यांनी आपल्या ज्ञात उत्पन्नाच्या स्रोतांपेक्षा तब्बल २ कोटी ६१ हजार रुपयांची अतिरिक्त मालमत्ता जमा केली आहे. ही संपत्ती त्यांच्या अधिकृत उत्पन्नापेक्षा सुमारे ८१.५ टक्के अधिक असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. गोपाल कुमार यांनी ऑक्टोबर २००८ मध्ये बिहार सरकारच्या सेवेत रूजू झाले. त्यानंतर २०२२ मध्ये त्यांना बढती देत कार्यकारी अभियंता म्हणून नियुक्त करण्यात आले. मात्र, सरकारी सेवेत आल्यानंतर त्यांनी कायदेशीर उत्पन्नापेक्षा कितीतरी अधिक मालमत्ता जमा केल्याचा त्यांच्यावर आरोप झाला. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने गोपाल कुमार यांच्या संबंधित ठिकाणावर छापे टाकले.
एकाचवेळी चार ठिकाणी छापेमारी
आर्थिक गुन्हे शाखेने १६ मे रोजी गोपाल कुमार यांच्याशी संबंधित चार वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. या कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांना प्रचंड प्रमाणात रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू आढळून आल्या. छाप्यात ३९ लाख ६५ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. याशिवाय, सुमारे ४७ लाख रुपयांच्या दागिन्यांच्या खरेदीशी संबंधित पावत्या देखील सापडल्या. तपासादरम्यान ४२४.०८ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून, त्यांची सध्याची बाजारातील किंमत सुमारे ६० लाख ४७ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. तसेच, जवळपास एक किलो वजनाचे चांदीचे दागिनेही जप्त करण्यात आले.
व्यावसायिक दुकाने, भूखंड आणि आलिशान फ्लॅटचा शोध
तपासादरम्यान जेबी मॉलमधील दोन व्यावसायिक दुकाने उघडकीस आली. या दुकानांची अंदाजित किंमत सुमारे ७० लाख रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच, दानापूर मार्केट कमिटीजवळील १.२५ कठा आकाराच्या निवासी भूखंडाशी संबंधित कागदपत्रेही जप्त करण्यात आली. या भूखंडावर सध्या G+3 इमारतीचे बांधकाम सुरू असून, जमिनीचे नोंदणीकृत मूल्य ३५ लाख रुपये असल्याचे समोर आले आहे. याशिवाय, आणखी ९३ लाख रुपयांच्या अतिरिक्त मालमत्तेची माहितीही तपासात उघड झाली. दानापूरमधील ‘लक्ष्मी कॉटेज’मध्ये असलेल्या एका आलिशान ४ BHK फ्लॅटसाठी ८० लाख रुपयांचे रोख पेमेंट केल्याचे दस्तऐवजही अधिकाऱ्यांच्या हाती लागले आहेत.
महागडी वाहने आणि सरकारी कागदपत्रे जप्त
छाप्यांदरम्यान एक ह्युंदय आय १० कार आणि एक स्कूटर जप्त करण्यात आली. याशिवाय, जमुई येथील भाड्याच्या निवासस्थानातून ८ लाख ३ हजार ९०० रुपयांची रोख रक्कम आणि ह्युंदय क्रेटा वाहन जप्त करण्यात आले. हे वाहन सुरेंद्र मोहन नावाच्या व्यक्तीच्या नावे नोंदणीकृत असून, ते १९ लाख रुपयांना खरेदी करण्यात आले होते. तपासादरम्यान तीन वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये सुमारे १० लाख रुपयांच्या ठेवी देखील आढळून आल्या आहेत.
अधिकाऱ्यांनाही बसला धक्का
गोपाल कुमार यांची मालमत्ता पाहून आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारीही आश्चर्यचकित झाले आहेत. केवळ सरकारी नोकरीच्या माध्यमातून इतकी प्रचंड संपत्ती उभारणे शक्य नसल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांखाली या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Web Summary : Bihar official Gopal Kumar's properties were raided, revealing crores in unaccounted wealth. Assets included cash, gold, property documents, and luxury vehicles. Investigations found assets exceeding known income by 81.5%, raising serious corruption concerns. Authorities are shocked by the scale of the discovery.
Web Summary : बिहार के अधिकारी गोपाल कुमार के ठिकानों पर छापे में करोड़ों की बेहिसाब संपत्ति मिली। नकदी, सोना, संपत्ति के कागजात और लग्जरी वाहन जब्त। जांच में ज्ञात आय से 81.5% अधिक संपत्ति मिली, जिससे भ्रष्टाचार की चिंता बढ़ी। अधिकारी संपत्ति देखकर हैरान हैं।