Join us
Daily Top 2Weekly Top 5

PM Modi: मोदींच्या नेदरलँड्स दौऱ्यात मोठी घोषणा, गुजरातमध्ये उभारणार अत्याधुनिक सेमीकंडक्टर प्लांट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2026 10:02 IST

TATA- ASML Semiconductor Partnership: टाटा इलेक्ट्रॉनिक्स आणि एसएमएल यांच्यात भारताच्या सेमीकंडक्टर निर्मिती क्षेत्राला बळकटी देण्यासाठी महत्त्वपूर्ण धोरणात्मक भागीदारी करण्यात आली.

टाटा इलेक्ट्रॉनिक्स आणि एसएमएल यांच्यात भारताच्या सेमीकंडक्टर निर्मिती क्षेत्राला बळकटी देण्यासाठी महत्त्वपूर्ण धोरणात्मक भागीदारी करण्यात आली. देशाच्या स्वदेशी चिप निर्मितीच्या दिशेने हे एक मोठे पाऊल मानले जात असून, भारताला जागतिक सेमीकंडक्टर नकाशावर अधिक मजबूत स्थान मिळवून देण्याची क्षमता या करारात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेदरलँड्स दौऱ्यादरम्यान शनिवारी या भागीदारीची घोषणा केली. या कराराअंतर्गत एएसएमएल ही कंपनी गुजरातमधील धोलेरा येथे उभारल्या जाणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक्सच्या ३०० मिमी सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन प्रकल्पासाठी अत्याधुनिक लिथोग्राफी यंत्रसामग्री आणि तांत्रिक उपाययोजना पुरवणार आहे.

एएसएमएल ही जगातील सर्वात महत्त्वाच्या सेमीकंडक्टर उपकरण उत्पादक कंपन्यांपैकी एक मानली जाते. कंपनी प्रगत लिथोग्राफी प्रणाली विकसित करते, ज्यांच्या मदतीने चिप उत्पादक अत्यंत सूक्ष्म आणि आधुनिक सेमीकंडक्टर चिप्स तयार करतात.स्मार्टफोन, कृत्रिम बुद्धिमत्ता, इलेक्ट्रिक वाहने, ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स आणि आधुनिक संगणकीय प्रणालींमध्ये वापरल्या जाणाऱ्या उच्च-कार्यक्षम चिप्सच्या निर्मितीसाठी एएसएमएलची यंत्रसामग्री अत्यावश्यक मानली जाते. विशेषतः अत्याधुनिक मायक्रोचिप उत्पादनासाठी लागणाऱ्या ‘हाय-एंड लिथोग्राफी’ तंत्रज्ञानामध्ये एएसएमएलला जागतिक स्तरावर अग्रगण्य स्थान आहे.

उत्पादन प्रक्रिया अधिक वेगवान आणि कार्यक्षम होणार

एएसएमएलसोबतच्या भागीदारीमुळे टाटा इलेक्ट्रॉनिक्सला जागतिक सेमीकंडक्टर पुरवठा साखळीतील अत्यंत महत्त्वाच्या तांत्रिक विभागामध्ये थेट प्रवेश मिळणार आहे. या सहकार्यामुळे धोलेरा येथील प्रकल्पातील उत्पादन प्रक्रिया अधिक वेगवान आणि कार्यक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. एका अधिकृत निवेदनात एएसएमएलने म्हटले आहे की, या सहकार्याचा मुख्य उद्देश धोलेरा प्रकल्पात कंपनीची संपूर्ण लिथोग्राफी यंत्रसामग्री आणि संबंधित उपाययोजना कार्यान्वित करून उत्पादन क्षमतेला गती देणे हा आहे.

भारत-नेदरलँड्स संबंध अधिक मजबूत होणार

या भागीदारीमुळे भारत आणि नेदरलँड्स यांच्यातील तंत्रज्ञान व औद्योगिक सहकार्यालाही नवी दिशा मिळणार आहे. भारत सरकार सध्या देशांतर्गत सेमीकंडक्टर उत्पादन वाढवण्यावर भर देत असून, या करारामुळे भारताच्या ‘मेक इन इंडिया’ आणि ‘डिजिटल इंडिया’ मोहिमांना मोठी चालना मिळणार असल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे, जागतिक स्तरावर चिप्सची वाढती मागणी आणि पुरवठा साखळीतील अडचणी लक्षात घेता भारत स्वतःचे मजबूत सेमीकंडक्टर इकोसिस्टम विकसित करण्याच्या दिशेने वेगाने पावले टाकत आहे. टाटा इलेक्ट्रॉनिक्स आणि एएसएमएल यांच्यातील ही भागीदारी त्या प्रयत्नातील एक निर्णायक टप्पा मानला जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : India to build semiconductor plant with Dutch collaboration: PM Modi

Web Summary : Tata Electronics and ASML partner to boost India's semiconductor manufacturing. A new semiconductor plant will be established in Dholera, Gujarat, with advanced technology, strengthening India's position in the global semiconductor market and boosting 'Make in India' initiative.
टॅग्स :नरेंद्र मोदीगुजरातव्यवसायटाटा