लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राष्ट्रवादीत (अजित पवार गट) गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संघटनात्मक बदलांच्या चर्चेला अखेर शनिवारी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न पक्षातर्फे करण्यात आला. पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे आपल्या पदांवर कायम असून त्यांच्याकडे पूर्वीप्रमाणेच पूर्ण अधिकार आहेत, असे स्पष्टीकरण पक्षाने दिले आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून पक्षांतर्गतच असलेले संभ्रमाचे वातावरण निवळले आहे.
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक आणि उमेश पाटील यांनी निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आलेल्या पत्रातील त्रुटीमुळे हा गोंधळ निर्माण झाल्याचे सांगितले. त्यांनी ही “कारकुनी चूक” असल्याचे स्पष्ट करत लवकरच सुधारित पत्र निवडणूक आयोगाला पाठवण्यात येणार असल्याचे सांगितले.
आताचे पदाधिकारी कायम, पक्ष एकसंघ
निवडणूक आयोगाला पाठवण्यात येणाऱ्या नव्या पत्रात वरिष्ठ नेत्यांच्या पदांची स्पष्ट नोंद तसेच काही नव्या संघटनात्मक नियुक्त्यांचाही समावेश असेल, असे अविनाश आदिक यांनी यावेळी सांगितले.
दिल्लीतील पक्ष कार्यालयात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना प्रवेश नाकारल्याच्या चर्चाही आदिक यांनी यावेळी फेटाळून लावल्या. पदाधिकाऱ्यांची सध्याची व्यवस्था कायम असून पक्ष एकसंघ असल्याचे ते म्हणाले.
संभ्रमावर अखेर पडदा...
२९ एप्रिल रोजी राष्ट्रीय अध्यक्षा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या स्वाक्षरीने निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या पदांचा उल्लेख नसल्याने खळबळ उडाली होती.
पटेल यांचा राज्यसभेतील पक्षनेते आणि तटकरे यांचा लोकसभेतील पक्षनेते असा उल्लेख होता; मात्र राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष ही पदनामे नमूद नव्हती. त्यामुळे त्यांना पक्षाच्या संघटनात्मक कामकाजातून दूर केल्याची चर्चा सुरू झाली होती.
पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन लवकरच दिल्लीत होणार आहे. पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत राष्ट्रीय स्तरावरील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती आणि संघटनात्मक फेरबदलांबाबत अंतिम निर्णय या अधिवेशनात घेतले जातील. तोपर्यंत सर्व विद्यमान प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष पूर्ववत काम पाहतील,असेही यावेळी सांगण्यात आले.
Web Summary : Nationalist Congress Party clarifies Patel and Tatkare retain their positions. A clerical error caused confusion. A revised letter will be sent to the Election Commission, confirming current leaders and appointments. Party unity is affirmed.
Web Summary : राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने स्पष्ट किया कि पटेल और तटकरे अपने पदों पर बने रहेंगे। लिपिकीय त्रुटि से भ्रम हुआ। चुनाव आयोग को एक संशोधित पत्र भेजा जाएगा, जिसमें वर्तमान नेताओं और नियुक्तियों की पुष्टि की जाएगी। पार्टी एकता की पुष्टि की गई है।