नेतान्याहूंच्या एका विधानाने आखाती देशांत खळबळ उडाली. ती नेमकी कशामुळे? : इस्रायल आणि यूएई यांच्यातील मैत्री जगजाहीर असली, तरी तिचे अनेक व्यवहार पडद्याआड अत्यंत गोपनीय पद्धतीने चालतात. मात्र, नुकत्याच एका घडामोडीमुळे ही ‘गुप्त’ मैत्री चव्हाट्यावर आली आणि त्यामुळे आखाती देशांत तणाव वाढला.
वादाची ठिणगी कशी पडली?
अमेरिकेच्या राजदूतांचे वक्तव्य : इस्रायलमधील अमेरिकेचे राजदूत माईक हकबी यांनी जाहीर सांगितले की, इस्रायलने सर्वांत प्रगत ‘आयर्न डोम’ ही हवाई संरक्षण यंत्रणा आणि सैनिक यूएईच्या रक्षणासाठी (इराणच्या हल्ल्यांपासून वाचवण्यासाठी) पाठवले आहेत.
नेतान्याहूंचा दावा : या खुलाशानंतर लगेचच इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी दावा केला की, त्यांनी युद्धादरम्यान यूएईचा गुप्त दौरा
केला होता.
यूएईने तातडीने दावे का नाकारले?
नेतान्याहूंच्या दाव्यानंतर यूएईने सांगितले की, ‘आमचे संबंध २०२०च्या ‘अब्राहम करारा’नुसार अधिकृत आहेत. आमचे कोणतेही गुप्त व्यवहार किंवा गुप्त लष्करी करार झालेले नाहीत.’ तसेच त्यांनी इस्रायलचे लष्कर यूएईमध्ये असल्याचा दावाही फेटाळला.
‘मैत्री’ विरुद्ध ‘लोकभावना’
यूएईने २०२० मध्ये इस्रायलला मान्यता दिली असली, तरी अरब जगतात आणि सामान्य जनतेमध्ये इस्रायलविरोधात तीव्र संताप आहे. गाझा व इराण युद्धामुळे तर तो अधिक घुमसत आहे. अशा स्थितीत अरब देशांचा नेता असलेल्या यूएईने इस्रायलकडून उघडपणे लष्करी मदत घेणे, हे त्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणारे आहे.
इस्रायल-यूएई मैत्री टिकून का?
या दोन्ही देशांमधील संबंधांमागे ‘भावना’ नसून ‘शुद्ध नफा-तोटा’ आणि ‘इराण’ हा समान शत्रू आहे.
यूएईचा फायदा : इराणपासून सुरक्षेसाठी इस्रायलचे ‘इरॉन डोम’सारखे प्रगत लष्करी तंत्रज्ञान मिळवणे आणि अमेरिकेशी संबंध बळकट करणे.
इस्रायलचा फायदा : मुस्लिम आणि अरब जगतात अधिकृतता मिळवणे, तसेच मुख्य शत्रू इराणच्या जवळ लष्करी तळ मिळवणे.
मग नेतान्याहूंनी आताच का वाच्यता केली?
नेतान्याहू सध्या इस्रायलमध्ये राजकीयदृष्ट्या अडचणीत आहेत. भ्रष्टाचारावरून त्यांना हटवण्यासाठी विरोधक पुन्हा एकवटत आहेत. तिथे निवडणुका जवळ येत आहेत आणि इराण युद्धामुळे त्यांची लोकप्रियता कमी झाली आहे.
प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न : आपल्या मतदारांना हे दाखविण्यासाठी की, ‘मी युद्धकाळातही अरब देशांना हाताळू शकतो आणि आखाती देशांमध्ये माझा मोठा प्रभाव आहे,’ यासाठी त्यांनी या गुप्त दौऱ्याची वाच्यता केली.
यातून एक गोष्ट स्पष्ट होते की, आखाती देशांमधील राजकारण हे पडद्यासमोर वेगळे आणि पडद्यामागे पूर्णपणे वेगळे सुरू आहे. नेतान्याहूंनी स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी पडदा बाजूला सारण्याचा प्रयत्न केला, पण यूएईने लगेचच तो पडदा पुन्हा ओढून घेतला आहे!
Web Summary : Netanyahu's disclosure of secret UAE visits and defense cooperation, including the Iron Dome, sparked controversy. UAE denies covert deals, prioritizing its image amidst Arab sentiment against Israel, despite mutual benefits driven by shared interests and countering Iran.
Web Summary : नेतन्याहू के यूएई के गुप्त दौरों और आयरन डोम सहित रक्षा सहयोग के खुलासे से विवाद खड़ा हो गया। यूएई ने गुप्त सौदों से इनकार किया, अरब जगत में इजराइल के खिलाफ भावनाओं के बीच अपनी छवि को प्राथमिकता दी, जबकि आपसी हित और ईरान का मुकाबला करने से लाभ होता है।