सुनेत्रा पवार यांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर जाणार? येवल्याची सूत्रे समीर भुजबळांकडे जाण्याची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 11:23 IST2026-05-07T11:17:05+5:302026-05-07T11:23:36+5:30
लोकसभा निवडणूक झाल्यानंतर राज्यसभेवर जाण्यास इच्छुक असलेल्या छगन भुजबळांचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे.

सुनेत्रा पवार यांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर जाणार? येवल्याची सूत्रे समीर भुजबळांकडे जाण्याची चर्चा
नाशिक : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आता खासदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय असून, घेतला त्यांच्या जागी कोण, याची पक्षात चर्चा असताना नाशिकमध्ये मात्र अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची राज्यसभेवर वर्णी लागण्याची चर्चा सुरू आहे. असे झाल्यास येवला मतदारसंघाची सुत्रे सांभाळण्याची माजी खासदार समीर भुजबळ यांची तयारी असून, त्यामुळेच गेल्या वर्षभरापासून ते या मतदारसंघात तळ ठोकून असल्याचे दिसते आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळीच छगन भुजबळ यांना भाजपचे नेते अमित शाह यांनी निवडणूक लढवण्यास सांगितले होते, असा दावा भुजबळ यांनी केला होता. त्यांची स्वतःदेखील तशी इच्छा होती तसेच तयारीदेखील होती. मात्र, राज्याचे राजकारण तसेच त्यावेळी राज्यात पेटलेला मराठा ओबीसी वाद यामुळे राज्यस्तरावर निर्णय होत नव्हता. त्यामुळे अखेरीस छगन भुजबळ यांनीच विलंबामुळे निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले होते.
मंत्रिमंडळात समावेश, समीर भुजबळांनी येवल्यात लक्ष घातले
दरम्यान, मंत्रिमंडळात समाविष्ट झाल्यानंतर मध्यंतरी भुजबळ यांची प्रकृती बिघडल्यानंतर भुजबळ यांचे पुतणे, माजी खासदार समीर भुजबळ हे येवल्याची सुत्रे सांभाळत होते. येवला नगरपालिकेची निवडणूकदेखील त्यांच्या नेतृत्त्वाखालीच लढवण्यात आली, त्यात यशही मिळाले.
छगन भुजबळ यांची लोकसभा निवडणुकीच्या वेळी संधी हुकली असली तरी मध्यंतरी राज्यसभेसाठी नाव चर्चेत होते. आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागेवर पुन्हा एकदा छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
लोकसभा निवडणुकीच्या वेळीच भाजप नेते अमित शाह हे भुजबळ यांना अनुकूल असल्याने आता ती संधी मिळाल्यास भाजपकडूनदेखील पाठबळ मिळण्याची शक्यता आहे, असेही राजकारणातील काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
ओबीसींचे लढवय्ये नेते
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे राष्ट्रवादीचे नेते आहेतच, शिवाय ओबीसींचे लढवय्ये नेते म्हणूनदेखील त्यांची ओळख आहे. समता परिषदेच्या माध्यमातून त्यांनी अनेक राज्यात त्यांनी ओबीसींचे मेळावे घेतले आहेत. त्यामुळे देशपातळीवर त्यांचा उपयोग होऊ शकेल, असेही सांगितले जात आहे. त्यामुळे भुजबळ यांच्या संदर्भात अनुकूल निर्णय होऊ शकतो, अशी चर्चा आहे.
समीर भुजबळ काय बोलले?
नव्या राजकीय चर्चेबद्दल बोलताना माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले की, "छगन भुजबळ यांचा राज्यसभेवर जाण्याचा तूर्त कोणताही विचार नाही. सध्याच्या राज्यसभेच्या जागेचा दोन ते अडीच वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. अशावेळी राज्यातील मंत्रीपद आणि ज्येष्ठता सोडून जाणे तितकेसे संयुक्तिक नाही."