धक्कादायक! १५ वर्षीय मुलीवर वडील अन् मामाकडून अत्याचार; नात्याला काळीमा फासणारी घटना उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 11:31 IST2026-05-07T11:31:36+5:302026-05-07T11:31:36+5:30
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन शाहूपुरी पोलिसांनी संशयित आरोपी पीडितेचे वडील आणि मामाला अटक केली.

धक्कादायक! १५ वर्षीय मुलीवर वडील अन् मामाकडून अत्याचार; नात्याला काळीमा फासणारी घटना उघड
कोल्हापूर- वयाच्या अवघ्या नवव्या वर्षापासून मुलगी जवळच्या नातेवाइकांच्या वासनेची शिकार बनली. जन्मदाते वडील, मामा आणि मामाच्या अल्पवयीन मुलानेही गेली पाच वर्षे अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार पोलिसांनी पीडितेचे वडील आणि मामाला अटक केली आहे.
जवळचे नातेवाईकच अल्पवयीन मुलींवर अत्याचार करीत असल्याच्या घटना राज्यात उघडकीस येत आहेत. कोल्हापुरातही असा गंभीर व नात्यांना काळिमा फासणारा प्रकार घडला आहे. जन्मदात्या वडिलाने नऊ वर्षीय मुलीशी अश्लील वर्तन केले. त्यानंतर मुलीच्या मामानेही तिच्याशी गैरवर्तन केले. मामाच्या अल्पवयीन मुलाने इचलकरंजी आणि कोल्हापूर येथील घरात इतर नातेवाईक नसताना अत्याचार केला. गेल्या पाच वर्षात वारंवार असे प्रकार घडल्याने पीडितेची आई मुलीला घेऊन घर सोडून निघून गेली होती. अखेर तिने मंगळवारी (दि. ५) शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन शाहूपुरी पोलिसांनी संशयित आरोपी पीडितेचे वडील आणि मामाला अटक केली. बुधवारी जिल्हा न्यायालयात हजर केले असता दोघांची पोलिस कोठडीत रवानगी झाल्याची माहिती पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली.
नात्याला काळिमा
अवघ्या १५ वर्षीय मुलीवर गेल्या पाच वर्षांपासून नातेवाइकांनी अत्याचार केला. या घटनेने नात्यांना काळिमा फासला असून, वासनांध नराधमांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी पीडितेच्या आईने पोलिसांकडे केली.