ऐन मंदीत बाजारपेठेला दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 01:41 AM2019-10-17T01:41:21+5:302019-10-17T01:42:29+5:30

नाशिक : राज्यभरात प्रचाराची रणधुमाळी सुरू असून, विविध पक्षांच्या प्रचारसभा आणि प्रचारफेऱ्या यामुळे सध्या निवडणुकीचे वातावरण तापले असून, मतदारांना ...

Relief to the market in the Ain recession | ऐन मंदीत बाजारपेठेला दिलासा

ऐन मंदीत बाजारपेठेला दिलासा

Next
ठळक मुद्देनिवडणुकीमुळे रोजगाराच्या संधी साड्यांसह, टोप्या, झेंडे प्रचार साहित्यांना मागणी

नाशिक : राज्यभरात प्रचाराची रणधुमाळी सुरू असून, विविध पक्षांच्या प्रचारसभा आणि प्रचारफेऱ्या यामुळे सध्या निवडणुकीचे वातावरण तापले असून, मतदारांना जिव्हाळ्याच्या वाटतील अशा दैनंदिन जीवनशैलीच्या वस्तूंना प्रचाराचे माध्यम बनविले जात आहे. यामध्ये साड्यांनी बाजी मारली आहे. नेत्यांची छबी असलेल्या साड्यांची मागणी वाढली आहे. आशियातील सर्वांत मोठी कापड बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाºया सुरत येथील बाजारात निवडणुकीमुळे तेजी दिसून येत असून, सुरतच्या व्यापाऱ्यांना हजारो साड्यांची आॅर्डर मिळत आहे.
देशभरातील विविध शहरांतून सुरतच्या व्यापाºयांकडे साड्यांची आॅर्डर नोंदविली जात आहे. एका वेळी २० हजारांएवढ्या साड्या मागविल्या जात आहेत. कार्यकर्त्यांना, मतदारांना देण्यासाठी या साड्या आहेत. डिजिटल प्रिंट प्रकारातील साड्यांची मागणी जास्त आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, स्मृती इराणी, निर्मला सीतारामन, सोनिया गांधी, प्रियंका गांधी, राहुल गांधी व शरद पवार यांच्या प्रतिमा छापलेल्या साड्यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांसह विविध पक्षांचे चिन्ह असलेल्या साड्या, टोप्या, गळ्यातील स्कार्र्प, पक्षाचे झेंडे आदी प्रचार साहित्याचा यात समावेश आहे.
विशेष म्हणजे देशात आर्थिक मंदीचे सावट असताना सर्वच उद्योगांना ग्राहकांची प्रतीक्षा आहे. अशा स्थितीत कापड उद्योगाला मात्र प्रचार साहित्याच्या माध्यमातून आयता ग्राहकवर्ग मिळाला असून, विविध पक्षांचे उमेवार हजारोंच्या संख्येने तर पक्षांचे प्रादेशिक कार्यालयात लाखोंच्या संख्याने प्रचार साहित्यांची खरेदी करीत असल्याने कापड बाजाराला आर्थिक मंदीच्या काळातही दिलासा मिळाला आहे.
स्वस्त आणि मस्त
प्रचारासाठी महिला कार्यकर्त्यांना साड्यांचे वाटप करण्यासाठी त्या परवडणाºया असाव्यात, असा उमेदवारांचा विचार असल्याने सुरतच्या साड्यांना पसंती मिळत असून, या साड्या स्वस्तात मस्त म्हणजे उमेदवारांच्या अपेक्षेप्रमाणे उपलब्ध होते. पक्षाचे नेते तथा पक्षचिन्ह छापलेल्या टोप्या, गळ्यातील पट्टे, पक्षाचे झेंडे आदी प्रचार साहित्यालाही प्रचंड मागणी असल्याने आर्थिक मंदीच्या काळात व्यापाºयांना दिलासा मिळत असून, त्यामुळे बाजारपेठेत सकारात्मक वातावरण निर्मिती होत असल्याचे व्यापाºयांचे म्हणणे आहे.
प्रचाराच्या वाहनांना मागणी वाढली
प्रचारासाठी लागणाºया साहित्याची ने-आण करणे, सभेसाठी मतदारांना सभास्थळी पोहोचविणे आणि नंतर घरी नेऊन सोडणे, प्रचारासाठी फिरणाºया कार्यकर्त्यांची प्रवासाची व्यवस्था करणे आदी कामांसाठी वाहनांचा उपयोग मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे. नाशिकमधील चारही विधानसभा मतदारसंघाचे भौगोलिक क्षेत्रफळ मोठे असल्याने कार्यकर्त्यांना प्रचारासाठी फिरताना वाहनांचा वापर करावा लागतो. त्यामुळे वाहनचालकांना निवडणुकीच्या काळात सुगीचे दिवस आले आहेत. छोटा हत्ती, जीप, टेम्पो, ट्रक, बस आदी वाहनांचा वापर केला जात असून, वाहनांची आसनक्षमता, आकार पाहून वाहनांचे भाडे ठरविले जाते. इंधन खर्च उमेदवाराने केला तर दिवसाच्या भाड्याचा वाहनाचा दर ठरावीक असतो. दिवसाला पाचशे रुपयांपासून ते पंधरा हजारांपर्यंत वाहनांचे भाडे दिले जात आहे. कार्यकर्त्यांच्या वापरासाठीची वाहने सकाळी ८ पासून ते रात्री ११ पर्यंत उमेदवारांच्या ताब्यात दिली जातात.
मंडपाच्या कामातून रोजगार विविध राजकीय नेत्यांच्या सभांसाठी लागणाºया मंडपाचे दर क्षेत्रफळानुसार ठरविले जातात. मंडप बांधण्यासाठी मजूर लागतात. एका राज्यस्तरीय नेत्याच्या सभेचा मंडप बांधणीचे काम किमान १०-१५ ते ५०-५५ मजुरांना करावे लागते, तर राष्ट्रीय नेत्यांच्या सभेचा मंडप बांधण्यासाठी किमान ५०-६० ते १००-११५ मजुरांना काम करावे लागते. सर्वसाधारणपणे या कामासाठी ६०० रुपये रोज दिला जात असल्याने प्रचार संपेपर्यंत कोणत्या ना कोणत्या उमेदवाराच्या सभांच्या माध्यमातून शेकडो बेरोजगार मजुरांना निवडणुकीमुळे रोजगार मिळतो आहे. त्यामुळे प्रचाराच्या रणधुमाळीचा पंधरवडा हा मजुरांच्या हाताला काम देणारा ठरला आहे.
वादकांच्या हातालाही मिळते काम
बाजारपेठेतील आर्थिक मंदीमुळे दिवसेंदिवस रोजगारावर परिणाम होऊन बेरोजगारी वाढत असताना गणेशोत्सव, नवरात्रोत्सव व लग्नसराईत हंगामी काम करणाºया वादक मंडळीच्या हातालाही राज्याच्या विधानसभा निवडणुकीमुळे रोजगार मिळाला आहे. प्रचारफेरीमध्ये तसेच सभांमध्ये तुताºया, सनई चौघडा वादक आणि सभेसाठी मंडप बांधणाºया मजुरांनाही रोजगार उपलब्ध झाला आहे. राजकीय नेत्यांच्या सभेत सनई चौघडे वाजविण्यासाठी तसेच प्रचारसभेमध्ये तुतारीवादन करणाºया वादकांनाही निवडणुकीच्या काळात रोजगार उपलब्ध झाला आहे. तुतारी वादनाला तासावर पैसे घेतले जातात. ते दर एक हजार रुपयांपासून सुरू होतात. सनई चौघडा वादनासाठी सभेच्या कालावधीनुसार तीन ते सात हजार रुपये असा दर आकारला जात आहे.

Web Title: Relief to the market in the Ain recession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.