'पाऊस पडला, मांडव उडाला; पण शुभमंगल सावधान झालंच!';नांदेडच्या अनोख्या विवाहाची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 11:31 IST2026-05-08T11:28:23+5:302026-05-08T11:31:54+5:30

नांदेड जिल्ह्यातील लखमापूरच्या लग्नात निसर्गाचा खेळ, पण वऱ्हाड्यांनी लावून धरली जिद्द, छत्रीच्या सावलीत श्रावणी-अर्जुन चढले बोहल्यावर!

Unique Wedding in Mahur: Mandap Blown Away by Storm, Couple Marries Under Umbrella Amidst Rain | 'पाऊस पडला, मांडव उडाला; पण शुभमंगल सावधान झालंच!';नांदेडच्या अनोख्या विवाहाची चर्चा

'पाऊस पडला, मांडव उडाला; पण शुभमंगल सावधान झालंच!';नांदेडच्या अनोख्या विवाहाची चर्चा

 

नांदेड : नवरी नटून थटून तयार, नवरदेवही बाशिंग लावून सज्ज आणि अक्षता टाकण्यासाठी वऱ्हाडींची लगबग... सगळं काही ठरल्याप्रमाणे सुरू असतानाच निसर्गाने मात्र वेगळाच खेळ मांडला. सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने अशी काही एन्ट्री केली की बघता बघता लग्नाचा मांडवच उडून गेला! पण म्हणतात ना, ‘गावकऱ्यांनी ठरवलं तर काहीच अशक्य नाही’. अशाच जिद्दीच्या जोरावर माहूर तालुक्यातील लखमापूर येथे गुरुवारी एका आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्याची ‘शुभमंगल’ गाठ बांधली गेली.

लखमापूर येथील श्रावणी जाधव आणि माहूरचा अर्जुन राठोड यांच्या लग्नाचा मुहूर्त दुपारचा होता. लग्नविधींना सुरुवात होणार इतक्यात अचानक आभाळ भरून आलं आणि वादळी वाऱ्यासह पावसाने बॅटिंग सुरू केली. वाऱ्याचा वेग इतका होता की, मांडव क्षणात उडून गेला. वऱ्हाडींची पळापळ झाली, पण नवरदेव-नवरीने आणि त्यांच्या कुटुंबीयांनी हार मानली नाही.

छत्रीखाली झाला विधी
पाऊस थांबण्याचे नाव घेत नव्हता आणि मुहूर्त तर टळत चालला होता. अखेर एका हाताने छत्री सावरत आणि दुसऱ्या हाताने विधी करत या जोडप्याचे लग्न लावण्यात आले. नवरी-नवरदेवाच्या डोक्यावर छत्र्या धरून ब्राह्मणांनी मंत्रोच्चार केले. भर पावसात ‘कुर्यात सदा मंगलम’चा आवाज घुमला आणि श्रावणी-अर्जुनने एकमेकांच्या गळ्यात माळ घातली.

वऱ्हाडींचा समजूतदारपणा अन् जिद्दीचा विजय
पावसामुळे जेवणावळीत आणि बसण्याच्या व्यवस्थेत मोठी गैरसोय झाली, तरीही वऱ्हाडी मंडळींनी काढता पाय न घेता भर पावसात उभे राहून वधू-वरांना आशीर्वाद दिले. ‘वरूण राजानेच अक्षता टाकून आशीर्वाद दिलाय’ अशी चर्चा लग्नमंडपात रंगली होती.

Web Title : बारिश से मंडप ढहा, फिर भी विवाह संपन्न: अनोखी शादी!

Web Summary : महाराष्ट्र के लखमापुर में भारी बारिश और मंडप गिरने के बावजूद, एक दृढ़ जोड़े ने छातों के नीचे अपनी शादी की रस्म पूरी की। ग्रामीणों के उत्साह और जोड़े के संकल्प ने 'शुभमंगल सावधान' सुनिश्चित किया, और मेहमानों ने बारिश में जश्न मनाया।

Web Title : Rain ruined wedding tent, vows taken: Unique wedding celebrated!

Web Summary : Despite heavy rain and a collapsed tent, a determined couple in Lakhmapur, Maharashtra, completed their wedding ceremony under umbrellas. The villagers' spirit and the couple's resolve ensured the 'Shubhmangal Savdhan' was fulfilled, with guests celebrating in the rain.