लग्नाच्या बोहल्यावर चढण्याआधीच सिंधी येथील नवरदेवाने गळफास घेऊन केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 01:56 IST2026-05-01T01:56:08+5:302026-05-01T01:56:39+5:30
अनिल तुकाराम गाढे वय २३ वर्षे राहणार सिंधी तालुका उमरी असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

लग्नाच्या बोहल्यावर चढण्याआधीच सिंधी येथील नवरदेवाने गळफास घेऊन केली आत्महत्या
येत्या ३ मे रोजी लग्नाची तारीख ठरलेली असल्याने घरामध्ये सर्वत्र लग्नाची धामधूम चालू असतानाच उमरी तालुक्यातील सिंधी गावात एका भावी नवरदेवाने गळफास घेऊन आत्महत्या केली. अनपेक्षित घडलेल्या या खळबळजनक घटनेमुळे सिंधी गावात हळहळ व्यक्त होत असतानाच सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे.
अनिल तुकाराम गाढे वय २३ वर्षे राहणार सिंधी तालुका उमरी असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मयत तरुणाचा भाऊ शंकर तुकाराम गाढे याने उमरी पोलिसात माहिती दिली की, ३० एप्रिल रोजी रात्रीच्या वेळी माझा भाऊ शेतात पाणी देण्यासाठी गेला होता. सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास कॅनॉलच्या बाजूस असलेल्या बेगाजी वामन उरुडवाड यांच्या आखाड्यातील टिन पत्र्याच्या लाकडाला दोरीने गळफास घेऊन त्याने आत्महत्या केल्याचे दिसून आले.
याबाबतची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक जयप्रकाश गुट्टे, अंमलदार सुनील कोलबुद्धे , बालाजी उमेवार, रामचंद्र जाधव, अरविंद हैबतकर आदींनी सिंधी येथे घटनास्थळी जाऊन पाहणी केली व पंचनामा केला. सदरप्रकरणी उमरी पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास सपोनि. बालाजी जाधव करीत आहेत. सदरील आत्महत्येच्या घटनेमागील कारण अद्याप तरी अस्पष्ट आहे.