गोरं होण्यासाठी क्रीम वापरली आणि दोन तरुणांची किडनी गेली; पाकिस्तानची 'ही' क्रिम तुमच्या जीवावर बेतू शकते !
By सुमेध वाघमार | Updated: April 18, 2026 14:17 IST2026-04-18T14:14:31+5:302026-04-18T14:17:06+5:30
Nagpur : पाकिस्तानमध्ये तयार होणाऱ्या 'गोरी' ब्युटी क्रीमची नागपुरातील कामठी परिसरात अक्षरशः खुलेआम विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार 'लोकमत'ने स्टिंग ऑपरेशनमधून उघडकीस आणला आहे.

Two young men lost their kidneys after using a cream to become fair; 'This' cream from Pakistan can kill you!
सुमेध वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पाकिस्तानमध्ये तयार होणाऱ्या 'गोरी' ब्युटी क्रीमची नागपुरातील कामठी परिसरात अक्षरशः खुलेआम विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार 'लोकमत'ने स्टिंग ऑपरेशनमधून उघडकीस आणला आहे. विशेष म्हणजे, या क्रीमच्या तपासणीत तब्बल ४७ हजार पट अधिक मर्क्युरी (पारा) आढळून आला असून, त्यामुळे किडनीच्या गंभीर आजाराने ग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असतानाही तिचा बाजार मात्र तेजीत सुरू असल्याचे संतापजनक वास्तव आहे. या घातक क्रीमच्या सतत वापरामुळे लघवीतून प्रोटीन बाहेर पडण्याची समस्या निर्माण होते, ज्याला 'मेंब्रनस नेफ्रोपॅथी' हा जीवघेणा किडनी विकार म्हणतात.
नागपुरातील एका खासगी रुग्णालयात अशा २२ हून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. तरीही ही क्रीम निर्धास्तपणे विकली जात असल्याने प्रशासनाच्या गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पाकिस्तानमधील 'गोरी कॉस्मेटिक्स' या कंपनीद्वारे तयार होणारी ही क्रीम त्वचा उजळवण्याच्या नावाखाली विकली जाते. मात्र, 'एम्स'च्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. मनीष श्रीगिरवार यांच्या तपासणीत या क्रिममध्ये तब्बल ४७,८९१.७पीपीएम मर्क्युरी आढळला, जो सुरक्षित मर्यादेपेक्षा हजारो पट अधिक आहे. त्यामुळे हे उत्पादन निकृष्टच नव्हे तर थेट जिवाशी खेळ करणारे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
क्रीमची बिलासह विक्री
'लोकमत' प्रतिनिधीने कामठीतील किराणा ओळीतील एका दुकानात जाऊन 'गोरी' क्रीमची मागणी केली असता, दुकानदाराने कुठलाही आढेवेढा न घेता ३३० रुपयांना क्रीम विकली. इतकेच नव्हे, तर मागणी करताच त्याने बिलही दिले. किडनी, मेंदू आणि त्वचेसाठी घातक ठरणाऱ्या या क्रीमचा असा बिनधास्त व्यापार सुरू असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
एफडीएची धडक, पण 'माल' गायब
या प्रकाराची माहिती मिळताच अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) शुक्रवारी संबंधित दुकानावर छापा टाकला. तपासणीदरम्यान दुकानदाराने 'गोरी' क्रीमचा पुरवठा मुंबईतून होत असल्याची लेखी कबुली दिली. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे, एक दिवस आधी सहज उपलब्ध असलेली क्रीम तपासणीवेळी पूर्णपणे गायब होती. यामुळे साठा मुद्दाम लपविण्यात आल्याचा संशय अधिक गडद झाला आहे. 'एफडीए'ने येत्या काही दिवसांत शहरभरातील सौंदर्य प्रसाधनांच्या दुकानांवर धडक कारवाईचे संकेत दिले आहेत. मात्र, जीवघेण्या 'गोरी' क्रीमचा काळाबाजार रोखण्यासाठी केवळ कारवाई पुरेशी ठरणार का, की या मागील संपूर्ण रॅकेट उघड होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.