जुळ्या भावंडांना मिळाले सेम टू सेम मार्क्स ! खुशी-खिलाजला दहावीत मिळाले ९७.८० टक्के
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 16:13 IST2026-05-09T16:11:54+5:302026-05-09T16:13:41+5:30
Nagpur : जुळी मुले म्हटली की त्यांच्या चेहऱ्यातील साम्य पाहून सगळ्यांनाच कौतुक वाटते. मात्र, नागपुरातील एका जुळ्या बहीण-भावाने केवळ जन्मच नाही, तर गुणवत्तेतही 'जुळेपणा' सिद्ध करत दहावीच्या निकालात अनोखा विक्रम घडविला आहे.

Twin siblings get same to same marks! Khushi-Khilaj get 97.80 percent in 10th
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जुळी मुले म्हटली की त्यांच्या चेहऱ्यातील साम्य पाहून सगळ्यांनाच कौतुक वाटते. मात्र, नागपुरातील एका जुळ्या बहीण-भावाने केवळ जन्मच नाही, तर गुणवत्तेतही 'जुळेपणा' सिद्ध करत दहावीच्या निकालात अनोखा विक्रम घडविला आहे. रामदासपेठ येथील सोमलवार हायस्कूलमधील खुशी चांदेवार आणि खिलाज चांदेवार या जुळ्या बहीण-भावाने दहावीच्या परीक्षेत अगदी समान ९७.८० टक्के गुण मिळवत गुणवत्ता यादीत दणक्यात स्थान मिळविले आहे.
विशेष म्हणजे, लहानपणापासून एकाच वर्गात शिकणाऱ्या या जुळ्या भावंडांमध्ये नेहमीच अभ्यासात चुरशीची स्पर्धा राहिली. कधी खुशी एक-दोन गुणांनी पुढे, तर कधी खिलाज आघाडीवर असायचा. पण, दहावीच्या निर्णायक टप्प्यावर दोघांनीही समान गुण मिळवत अक्षरशः 'गुणांचाही जुळेपणा' सिद्ध केला.
खुशी खिलाजचे आणि वडील बळीराम चांदेवार हे असून आई विशाखा चांदेवार या खासगी संस्थेत जिल्हा परिषदेत शिक्षक शिक्षिका आहेत. मुलांच्या यशाबद्दल बोलताना आई विशाखा म्हणाल्या, दोघेही स्वतंत्रपणे अभ्यास करायचे. मात्र, एखादा विषय समजला नाही तर ते एकमेकांशी चर्चा करून कन्सेप्ट क्लिअर करायचे. अभ्यासातील शंका विचारून त्याचे निरसन करून घेण्याची त्यांची सवय होती. त्यामुळे दोघांचाही अभ्यास अधिक मजबूत झाला.
त्या म्हणाल्या, लहानपणापासूनच त्यांच्या अभ्यासात सातत्य राहिले. शिस्तप्रिय स्वभाव, सेल्फ स्टडी आणि मेहनत हे त्यांचे सर्वात मोठे गुण आहेत. शाळेतील शिक्षकांचेही त्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले.
शालेय जीवनात नेहमीच एक-दोन गुणांची तफावत असणाऱ्या या जुळ्या भावंडांनी दहावीच्या निकालात मात्र एकाच आकड्यावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे त्यांच्या यशाची चर्चा शहरभर रंगली आहे.
दहावीनंतर जेईईची तयारी करून भविष्यात यूपीएससी परीक्षा देत प्रशासकीय अधिकारी बनण्याचे स्वप्न खुशी आणि खिलाज यांनी डोळ्यांत साठवले आहे. जुळ्या भावंडांच्या या अनोख्या यशाचे नागपूरकरांमध्ये कौतुक आहे.