अल निनोच्या दृष्टीने तयारी सुरू, दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन सतर्क
By योगेश पांडे | Updated: April 20, 2026 17:53 IST2026-04-20T17:52:52+5:302026-04-20T17:53:40+5:30
Nagpur : राज्यात संभाव्य दुष्काळजन्य परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने व्यापक उपाययोजना आखण्यास सुरुवात केली असून संपूर्ण प्रशासन सतर्क ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती राज्याचे महसूलमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

Preparations underway in view of El Nino, administration on alert to deal with drought situation
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यात संभाव्य दुष्काळजन्य परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने व्यापक उपाययोजना आखण्यास सुरुवात केली असून संपूर्ण प्रशासन सतर्क ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती राज्याचे महसूलमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. नागपुरात ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
मंत्रिमंडळ बैठकीत सर्व पालकमंत्र्यांना अल निनोच्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. राज्यातील संभाव्य दुष्काळ परिस्थितीवर शासनाची भूमिका आणि उपाययोजना यावर लवकरच सविस्तर बैठक होणार असून त्यात विविध बाबींचा आढावा घेतला जाणार आहे, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधक व कॉंग्रेसवर टीकास्त्र सोडले. कॉंग्रेसने लाडक्या बहिणींचा विश्वासघात काँग्रेसने केला असून या वृत्तीचा जनता बदला घेईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना संसदेत मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध करून दिली असताना अनुसूचित जाती, ओबीसी आणि इतर घटकांतील महिलांना पुढे येण्यापासून रोखण्याचे काम काँग्रेसने केल्याचा आरोप त्यांनी केला. यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी मुली बेपत्ता प्रकरणाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, या संदर्भातील माहिती गृह खात्याकडे असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घातले आहे. विदर्भातील हा गंभीर प्रश्न असल्याने आपणही लक्ष ठेवणार असून आदिवासी मंत्री अशोक ऊईके यांच्याकडूनही या प्रकरणावर देखरेख ठेवली जात आहे.
परतवाडा प्रकरणात धार्मिक तेढ टाळा
परतवाडा प्रकरणाबाबत बावनकुळे यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांना चिमटा काढला. पूर्ण अधिकृत माहिती बाहेर येईपर्यंत कोणत्याही प्रकारचे आरोप-प्रत्यारोप टाळावेत. अशा संवेदनशील प्रकरणांमुळे दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होऊन अमरावतीचे वातावरण बिघडू नये, याची सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.