“जिथे कोणी जात नाही तिथे मी जातो”; DCM शिंदेंचा दुर्गम भागापर्यंत विकास पोहोचवायचा निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 08:17 IST2026-04-21T08:15:05+5:302026-04-21T08:17:22+5:30
Deputy CM Eknath Shinde: मुख्यमंत्रीपदाच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात ५६७ निर्णय घेतल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

“जिथे कोणी जात नाही तिथे मी जातो”; DCM शिंदेंचा दुर्गम भागापर्यंत विकास पोहोचवायचा निर्धार
Deputy CM Eknath Shinde: मी उपमुख्यमंत्री म्हणून नाही, तर या मातीचा भूमिपुत्र म्हणून आलो आहे; जिथे कोणी जात नाही तिथे मी जातो, असा भावनिक आणि ठाम संदेश देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंगापूर पंचकोशीतील भव्य नागरी सत्कार सोहळ्यात सर्वसामान्यांशी असलेले आपले नातs अधोरेखित केले. छोट्या गावांपासून दुर्गम भागापर्यंत विकास पोहोचवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त करत ५६७ निर्णयांच्या कामगिरीचा उल्लेख केला.
मोठ्या शहरांमध्ये सगळे जातात; पण छोट्या गावांकडे दुर्लक्ष होते. मात्र, जिथे कोणी जात नाही तिथे एकनाथ शिंदे जातो,” असे सांगत त्यांनी कोकणातील लक्ष्मीनारायण मंदिर लोकार्पणाचा उल्लेख केला. मुंबईचा आमदार असूनही मी येणार नाही, असा समज गावकऱ्यांचा होता; पण मी गेलो, असा किस्साही त्यांनी सांगितला.
अडीच वर्षांच्या कार्यकाळात ५६७ निर्णय घेतले
कर्जमाफी आंदोलनासाठी येथे आलो होतो आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, अशी आठवण त्यांनी करून दिली. मुख्यमंत्रीपदाच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात ५६७ निर्णय घेतल्याचे सांगत त्यांनी लाडकी बहीण योजना, शेतकरी सन्मान योजना, विद्यार्थ्यांसाठी उपक्रम यांचा उल्लेख केला. कोणीही आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांसाठी केंद्राच्या ६,००० रुपयांच्या योजनेत राज्याने ६,००० रुपये वाढवून १२,००० रुपयांचा लाभ दिला. नुकसानभरपाईच्या अटी सुलभ केल्या, सिंचन प्रकल्पांना गती दिली आणि ग्रामीण भागात विकासाचा वेग वाढवला, असे त्यांनी सांगितले.
ही माती अन्यायाविरुद्ध लढायला शिकवते
साताऱ्याच्या मातीचे कौतुक करताना ते म्हणाले, ही माती अन्यायाविरुद्ध लढायला शिकवते. स्वतःला साताऱ्याचा भूमिपुत्र संबोधत त्यांनी या सत्काराला भावनिक स्वरूप असल्याचे सांगितले. साताऱ्यातील अनेक गावे देशाच्या सीमेवर लष्करात सेवा देत असल्याचा उल्लेख करत त्यांनी अभिमान व्यक्त केला.
महायुती सरकारला मिळालेल्या जनसमर्थनाचा उल्लेख करत त्यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकांतील यशाबद्दल जनतेचे आभार मानले. २३२ जागा देऊन जनतेने इतिहास घडवला, असे ते म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील यशाबद्दलही त्यांनी कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.
जनतेच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आणण्यासाठी काम करतो
आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही; पण जनतेच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आणण्यासाठी काम करत आहोत, असे सांगत त्यांनी माणसं कमावणं हेच खरे यश, हा संदेश दिला. प्रेरणा, ऊर्जा आणि समाजसेवेचे बळ मिळावे, अशी प्रार्थना त्यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांना कधीही वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही देत त्यांनी बळीराजासाठी सुख-समृद्धीची कामना केली. हा सन्मान माझ्या लाडक्या बहिणी, भाऊ, शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिकांचा आहे. उपस्थित नागरिकांचे आभार मानत त्यांनी विकासाचा अजेंडा अधिक वेगाने पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला.
दरम्यान, पालकमंत्री निधी आणण्यात कुशल आहेत, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडणारे पूल उभारले जात असल्याचे सांगत त्यांनी दुर्गम भागातही पायाभूत सुविधा वाढवल्या जात आहेत. स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यावर भर देत स्थलांतर रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तीर्थक्षेत्र विकासासाठी निधी २ कोटींवरून ५ कोटी रुपये केल्याची माहिती देत त्यांनी वारकऱ्यांसाठी दिंडी अनुदान सुरू केल्याचे सांगितले.