नागपुरातील बारमधील मस्करीची जीवघेणी कुस्करी, गळ्यात चाकू लागल्याने कॅशिअरचा मृत्यू

By योगेश पांडे | Updated: May 7, 2026 22:15 IST2026-05-07T22:14:49+5:302026-05-07T22:15:35+5:30

बारटेंडरला अटक

prank gone wrong in a bar in nagpur a cashier dies after being stabbed in the neck | नागपुरातील बारमधील मस्करीची जीवघेणी कुस्करी, गळ्यात चाकू लागल्याने कॅशिअरचा मृत्यू

नागपुरातील बारमधील मस्करीची जीवघेणी कुस्करी, गळ्यात चाकू लागल्याने कॅशिअरचा मृत्यू

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : विविध कारणांसाठी चर्चेत असलेल्या धरमपेठेतील टोकियो बारमध्ये दोन कर्मचाऱ्यांमधील मस्करी ही थेट एकाच्या जीवावर उठली. बारटेंडरने फेकलेला चाकू तेथील कॅशिअरच्या गळ्याच्या खाली घुसला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. सिताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

अवधेश कुमार (२६, रायबरेली, उत्तरप्रदेश) असे मृतकाचे नाव आहे. तो टोकियो बारमध्ये कॅशिअरचे काम करत होता. तर आरोपी आयुष नेगी (२४, उत्तरांखड) हा तेथे बारटेंडर आहे. गुरुवारी दोघेही नेहमीप्रमाणे कामावर आले. सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास ग्राहक कमी असल्याने इतर कर्मचारी व अवधेश तसेच आयुष एकमेकांशी बोलत होते. दोघांमध्येही मस्करी सुरू झाली.

काही वेळ मस्करी सुरू राहिली व त्यानंतर त्यांच्यात शाब्दिक वाद सुरू झाला. त्यातूनच दोघांनीही एकमेकांवर काऊंटरवरील चाकू फेकून मारण्यास सुरुवात केली. बारटेंडर आयुषने लिंबू कापण्याचा व बंद असलेला चाकू अवधेशच्या दिशेने फेकला. तो चाकू उघडला आणि अवधेशच्या गळ्याच्या खाली घुसला. बहुदा तो चाकू श्वासनलिकेजवळ घुसला होता. यामुळे बारमध्ये खळबळ उडाली. अवधेश चाकूला तसेच गळ्याजवळ पकडून बाहेर चालत निघाला.

आयुष व इतर कर्मचारी त्याला गाडीतून दंदे इस्पितळ व नंतर वोक्हार्ट इस्पितळात घेऊन गेले. मात्र डॉक्टरांनी अवधेशला मृत घोषित केले. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी आयुषला ताब्यात घेतले. या घटनेमुळे पोलिसदेखील अचंबित झाले आहेत. अवशेधच्या कुटुंबियांना या दुर्दैवी घटनेची माहिती देण्यात आली आहे.

चार महिन्यांअगोदरच नागपुरात आला होता मृतक

आयुष हा मुळचा उत्तराखंडचा असून तो पाच महिन्यांअगोदर टोकियो बारमध्ये बारटेंडर म्हणून कामाला लागला होता. तर अवधेश चार महिन्यांअगोदरच नागपुरात आला होता. घरची परिस्थिती फारशी चांगली नसल्याने एका ओळखीच्या तरुणाच्या माध्यमातून तो कामाला लागला होता. आयुष व अवधेशमध्ये अगोदर कुठलाही वाद झाला नव्हता व दोघांची कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमीदेखील नव्हती. संबंधित घटना बारच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

Web Title : नागपुर बार में मजाक बना जानलेवा: चाकू लगने से कैशियर की मौत

Web Summary : नागपुर के एक बार में एक मज़ाक त्रासदी में बदल गया जब एक बारटेंडर द्वारा फेंका गया चाकू एक कैशियर को घातक रूप से लग गया। कैशियर की अस्पताल में मौत हो गई। पुलिस ने बारटेंडर को गिरफ्तार कर लिया। घटना सीसीटीवी में कैद हो गई।

Web Title : Nagpur Bar Prank Turns Deadly: Cashier Killed by Knife

Web Summary : A playful prank at a Nagpur bar turned tragic when a bartender's thrown knife fatally struck a cashier. The cashier died at the hospital. Police arrested the bartender. The incident was captured on CCTV.