कर्म तसे फळ ! चोरट्याच्या हातून पुन्हा फोन चोरीला; गुन्हा कसा नोंदवावा ? पोलिसांनाही पडला प्रश्न
By नरेश डोंगरे | Updated: April 18, 2026 19:13 IST2026-04-18T19:12:06+5:302026-04-18T19:13:15+5:30
Nagpur : मौज मस्ती करून परतणाऱ्या एका चोरट्याला रेड लाईट एरियात दोन भामट्यांनी बेदम चोप देऊन लुटले. विशेष म्हणजे, या चोरट्याचा शोध घेणाऱ्या पोलिसांनी त्याला पकडल्यानंतर त्यानेच 'हम तो लूट गये, भरे बाजार मे', अशी कैफियत पोलिसांना ऐकवली.

Karma is like fruit! Phone stolen again by thief; How to register a crime? Even the police had a question
नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मौज मस्ती करून परतणाऱ्या एका चोरट्याला रेड लाईट एरियात दोन भामट्यांनी बेदम चोप देऊन लुटले. विशेष म्हणजे, या चोरट्याचा शोध घेणाऱ्या पोलिसांनी त्याला पकडल्यानंतर त्यानेच 'हम तो लूट गये, भरे बाजार मे', अशी कैफियत पोलिसांना ऐकवली. त्यामुळे काही वेळेसाठी पोलीसही बुचकळ्यात पडले.
ही मासले वाईक घटना इतवारी रेल्वे स्थानक ते गंगा जमुना परिसरातील आहे. बालाघाट येथील अभियंता, कुणाल (नाव काल्पनिक) शुक्रवारी १७ एप्रिलला सायंकाळी इतवारी रेल्वे स्थानकावर पोहोचला. तेथे बुकिंग काउंटर समोर त्याला एका ज्येष्ठ नागरिकांनी रिझर्वेशन फॉर्म भरून देण्याची विनंती केली. त्यानुसार कुणालने 'बाबा'जी चा फॉर्म भरून देण्याला सुरुवात केली. या वेळेत आपला महागडा मोबाईल चार्ज करून घ्यावा म्हणून कुणालने तो बाजूच्याच चार्जिंग बोर्डवर लावला.
दरम्यान, सावज शोधत असलेल्या चोरट्याची या आकर्षक आणि महागड्या मोबाईलवर नजर गेली आणि अभियंत्याचे काही क्षणासाठी दुर्लक्ष होताच त्याने तो मोबाईल लंपास केला. दरम्यान, रिझर्वेशन फॉर्म भरून झाल्यानंतर कुणाल मोबाईल घेण्यासाठी वळला असता त्याला तेथे मोबाईल आढळला नाही. हा मोबाईल त्याच्या ॲपल वॉचला कनेक्ट होता. कुणाल स्वतः टेक्नोसेवी असल्याने त्याने त्या माध्यमातून मोबाईल पळविणाऱ्या चोरट्याचे लोकेशन शोधण्याचा प्रयत्न केला. दोन तास प्रयत्न करूनही चोरटा गवसत नसल्यामुळे त्याने जीआरपी ठाण्यात धाव घेतली. ठाणेदार नीलम डोंगरे आणि सहकाऱ्यांनी लगेच रेल्वे सुरक्षा दलाच्या सीसीटीव्ही कंट्रोल रूम मध्ये जाऊन पाहणी केली. तेव्हा एक चोरटा हा मोबाईल घेऊन थेट रेडलाईट एरिया अर्थात गंगा जमुना परिसरात दिसून आला. त्यानुसार रेल्वे पोलिसांचे पथक तिकडे धावले.
रात्री आठ-नऊ वाजेपर्यंत शोधाशोध केल्यानंतर सीसीटीव्हीतील संशयित पोलिसांच्या हाती लागला. त्याला पोलीस ठाण्यात आनल्यानंतर 'बाजीराव'चा प्रसाद देण्यात आला. दोन फटक्यात चोरट्याने मोबाईल चोरीची कबुली दिली. मात्र, गंगा जमुनातील एका वारंगणेकडे हा मोबाईल विसरल्याचे सांगितले. त्यानुसार पोलीस त्याला घेऊन पुन्हा रेडलाइट एरियात गेले. मध्यरात्रीपर्यंत शोधाशोध करूनही तो त्या वारांगणेचे ठिकाण सांगू शकला नाही. तो बनवाबनवी करीत असल्याचे लक्षात आल्यामुळे त्याला पुन्हा पोलीस ठाण्यात आणून त्याची खातरदारी करण्यात आली. यावेळी त्यांने गंगाजमुनातून बाहेर पडताना स्कूटरवर आलेल्या दोघांनी आपल्याला मारहाण केली आणि मोबाईल हिसकावून नेल्याचे सांगितले.
कहानीत ट्विस्ट, पोलीस संभ्रमात !
चोरटा खरा बोलतो की खोटा हे तपासण्यासाठी रेल्वे पोलिसांनी त्या भागात जाऊन पुन्हा सीसीटीव्ही चेक केले. यावेळी रेडलाईट एरियात या मोबाईल चोरट्याला दोन भामट्यांनी बेदम चोप देऊन त्याच्या जवळचा मोबाईल हिसकावून नेताना दिसून आले. चोरीच्या प्रकरणात असा ट्विस्ट आल्यामुळे पोलिस संभ्रमात सापडले आहेत. ज्या चोरट्याला पोलिसांनी अटक करण्यासाठी पकडले, त्या चोरट्याची तक्रार नोंदवून घेण्याची वेळ पोलिसांवर आली आहे.
आता काय करायचे !
एकाच चोरीच्या घटनेत दोन गुन्हे घडल्याने, आता कसे करावे, असा प्रश्न खुद्द पोलिसांना पडला आहे. यासंबंधी पोलीस विधी अधिकाऱ्यांकडून माहिती वजा सल्ला घेत आहेत. दुसरीकडे लूटमार करणाऱ्या त्या दोन भामट्यांचाही पोलीस शोध घेत आहेत.