शासनाची हरभरा खरेदी दोन दिवसांत बंद ! ४० टक्के शेतकऱ्यांचा माल अजूनही घरातच
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 16:09 IST2026-05-12T16:08:09+5:302026-05-12T16:09:35+5:30
Nagpur : यंदा हरभऱ्याचे उत्पादन समाधानकारक झाले असतानाही शासनाकडून खरेदीचे उद्दिष्ट अत्यल्प ठेवल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वाढीव उद्दिष्टासह दुसऱ्यांदा सुरू करण्यात आलेली हरभरा खरेदी अवघ्या दोन दिवसांतच बंद पडल्याने अनेक शेतकऱ्यांची घोर निराशा झाली आहे.

Government's gram procurement stopped for two days! 40 percent of farmers' goods still at home
लोकमत न्यूज नेटवर्क
नरखेड : यंदा हरभऱ्याचे उत्पादन समाधानकारक झाले असतानाही शासनाकडून खरेदीचे उद्दिष्ट अत्यल्प ठेवल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वाढीव उद्दिष्टासह दुसऱ्यांदा सुरू करण्यात आलेली हरभरा खरेदी अवघ्या दोन दिवसांतच बंद पडल्याने अनेक शेतकऱ्यांची घोर निराशा झाली आहे. परिणामी नरखेड तालुक्यातील सुमारे ४० टक्के शेतकऱ्यांचा हरभरा अजूनही घरातच पडून आहे.
यापूर्वी निर्धारित उद्दिष्ट पूर्ण झाल्याने खरेदी प्रक्रिया थांबविण्यात आली होती. त्यानंतर शासनाने वाढीव उद्दिष्टास मंजुरी देत खरेदी पुन्हा सुरू केली. मात्र, वाढ अत्यल्प असल्याने काहीच शेतकऱ्यांचा माल खरेदी होऊ शकला. तालुक्यातील ५०० हून अधिक नोंदणीकृत शेतकऱ्यांना आता हरभरा खासगी व्यापाऱ्यांना विकण्याची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. खरेदी बंद झाल्याने आता खुल्या बाजारात कमी दराने माल विकण्याची वेळ येणार आहे. शेतकऱ्यांना क्विंटलमागे सुमारे ८०० रुपयांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.
रिकाम्या हाताने परततात
शासनाच्या खरेदी केंद्रांवर दररोज मोठ्या प्रमाणात शेतकरी हरभरा घेऊन येत असले तरी मर्यादित खरेदी क्षमता, अपुरी व्यवस्था आणि नोंदणी प्रक्रियेतील अडचणींमुळे अनेकांना प्रतीक्षा करावी लागत आहे.
वाढीव उद्दिष्ट संपले
रब्बी हंगाम २०२६ अंतर्गत हरभरा खरेदीसाठी केंद्र शासनाने पूर्वी मंजूर केलेल्या ७ लाख ६१ हजार २५० मेट्रिक टन उद्दिष्टात ५८ हजार ६३२ मेट्रिक टनांची वाढ करून एकूण ८ लाख १९ हजार ८८२ मेट्रिक टन खरेदीस मंजुरी दिली आहे. तसेच खरेदी कालावधी २९ मे २०२६ पर्यंत वाढविण्यात आला आहे. मात्र ही वाढ प्रत्यक्षात अपुरी ठरली.