मध्य रेल्वेत फॉरेन टूरिस्ट कोट्यात धांदली; ३९ प्रकरणं उजेडात
By नरेश डोंगरे | Updated: May 7, 2026 19:12 IST2026-05-07T19:10:17+5:302026-05-07T19:12:03+5:30
Nagpur : मध्य प्रदेशात रेल्वेच्या व्हीआयपी कोट्यात गैरप्रकार झाल्याचे प्रकरण खळबळ उडवून गेले असतानाच आता मध्य रेल्वेत विदेशी पर्यटकांच्या (एफटी) कोट्यावर डल्ला मारून त्या तिकिटा दुसऱ्या प्रवाशांना विकण्याचा गोरखधंदा उजेडात आला आहे.

Fraud in foreign tourist quota in Central Railway; 39 cases come to light
नरेश डोंगरे - नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मध्य प्रदेशात रेल्वेच्या व्हीआयपी कोट्यात गैरप्रकार झाल्याचे प्रकरण खळबळ उडवून गेले असतानाच आता मध्य रेल्वेत विदेशी पर्यटकांच्या (एफटी) कोट्यावर डल्ला मारून त्या तिकिटा दुसऱ्या प्रवाशांना विकण्याचा गोरखधंदा उजेडात आला आहे.
संघमित्रा एक्सप्रेसमधील तिकिट तपासणीस (टीसी)च्या सतर्कतेमुळे उघडकीस आलेल्या या गोरखधंद्यात रेल्वेत तिकिटांची धांदली करणारे अनेक जण सक्रिय असावे, असा संशय असून, त्या संबंधाने मध्ये रेल्वेकडून कसून तपास केला जात आहे.
ट्रेन नंबर १२२९६ संघमित्रा एक्सप्रेसमध्ये ४ फेब्रुवारीला टीसीकडून तिकिट तपासणी सुरू असताना त्यांना काही भारतीय प्रवासी एफटी (विदेशी पर्यटक) कोट्यातील तिकिटांवर प्रवास करताना आढळले. विदेशी पर्यटकांना भारतात रेल्वेतून प्रवास करताना अडचण येऊ नये किंवा त्यांना तिकिट मिळवण्यासाठी त्रास होऊ नये म्हणून एफटी कोटा अलाट केला जातो. मात्र, त्यासाठी संबंधित प्रवाशाला आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात. प्रवास करतानाही ही कागदपत्रे जवळ बाळगावी लागतात. संघमित्रा एक्सप्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडे अशा प्रकारची कागदपत्रे नव्हती. त्यामुळे त्यावेळी टीसींनी त्यांची कसून चाैकशी केली. यात मोठे गाैडबंगाल असल्याचा संशय आल्यामुळे त्यांनी हे प्रकरण मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपविले. त्यानुसार, अशा प्रकारे एफटी कोट्यात तिकिट मिळवून प्रवास करणारांचे विविध तारखांच्या बुकिंगचे विश्लेषण करण्यात आले. त्यात एफटी कोट्याचा गैरवापर करून ३९ पीएनआर बुक केल्याचे आढळले. १२१ प्रवासी अनियमितपणे असा प्रवास करत असल्याचेही उजेडात आले.२४ एप्रिल ते ११ जून २०२६ या कालावधीत एफटी कोट्याअंतर्गत ३१ गाड्यांसाठी मध्य रेल्वेचे १७४ ओरिजिनेटिंग पीएनआर तयार करण्यात आल्याचेही प्राथमिक तपासात उघड झाले. त्यामुळे गैरप्रकाराचा अवलंब करून एफटी कोटा लाटणाऱ्या संबंधित प्रवाशांचे तिकिट रद्द करून त्यांना दंडाचा दणका देण्यात आला. त्यांच्याकडून ३ लाख, ५६ हजार, ९१६ रुपये दंडाखातर वसूल करण्यात आले.
गैरप्रकारात कुणाकुणांचा सहभाग
रेल्वे प्रशासनाच्या डोळ्यात धुळफेक करून स्वत:ची तुंबडी भरणाऱ्या या गैरप्रकारात कुणाकुणाचा सहभाग आहे, त्याची चाैकशी केली जात आहे. यात कोणते अधिकृत बुकिंग एजंट सहभागी आहेत का, हे निश्चित करण्यासाठी आयआरसीटीसीकडून अतिरिक्त तपशील मागवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
कोणती शहरे, कुठून गैरप्रकार ?
विदेशी पर्यटकांच्या कोट्यांवर डल्ला मारण्याचा हा गैरप्रकार कोणकोणत्या शहरातून करण्यात आला, त्या संबंधाने रेल्वेच्या मुंबईतील जनसंपर्क अधिकाऱ्यांकडे आणि आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी या संबंधाने तूर्त माहिती उपलब्ध नाही, असे उत्तर दिले.
पश्चिम मध्य रेल्वेत जुनी शिफारसपत्र स्कॅन
विशेष म्हणजे, पश्चिम मध्य रेल्वेचे मुख्य वाणिज्य व्यवस्थापकांचे खासगी सचिव अमितकुमार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची जुनी शिफारसपत्र स्कॅन केली. त्यात फेरफार करून त्याआधारे रेल्वेच्या व्हीआयपी कोट्यातून अनेक वेटिंगवरील तिकिटे कन्फर्म केल्याचा आरोप आहे. उघडकीस आलेल्या या दोन्ही प्रकरणामुळे रेल्वेच्या विविध डिव्हीजननध्ये खळबळ निर्माण झाली आहे.