“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 19:34 IST2026-05-07T19:31:41+5:302026-05-07T19:34:03+5:30
NCP Jay Pawar News: अजितदादांना मुख्यमंत्री म्हणून पाहण्याची सर्वच बारामतीकरांची इच्छा होती, असे जय पवार यांनी म्हटले आहे.

“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
NCP Jay Pawar News: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवानेते जय अजित पवार यांनी बारामती येथे जनता दरबाराची सुरुवात केली. पहिल्याच जनता दरबाराला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र पहायला मिळाले. २०२९ मध्ये सुनेत्रा पवार या केवळ बारामती मतदारसंघाच्या उमेदवार नसतील, तर त्या मुख्यमंत्रीपदाच्या दावेदार असतील, असा मोठा दावा जय पवार यांनी केला. जनता दरबारानंतर जय पवार पत्रकारांशी बोलत होते.
बारामतीतील जनतेच्या समस्या जलदगतीने सोडवण्यासाठी दर आठवड्याच्या प्रत्येक गुरुवारी जय अजित पवार जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांना भेटणार आहेत. अजितदादा हे दर आठवड्याला जनता दरबार घेत नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करत होते. तोच प्रयत्न मी केला. पहिल्याच जनता दरबाराला चांगला प्रतिसाद मिळाला. आरोग्य, शिक्षण, वीज, पाणी, रस्ते अशा अनेक समस्या नागरिकांनी मांडल्या. या प्रश्नाबाबत अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात दिल्या आहेत. पाणीप्रश्नावर उपाययोजना करण्याच्या सूचनाही संबंधितांना दिल्या आहेत, अशी माहिती जय पवार यांनी दिली.
२०२९ला सुनेत्रा पवारमुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार असतील
काही दिवसांपूवर्वी माझ्या जवळच्या सहकार्यांबरोबर चर्चा झाली. अजितदादांना मुख्यमंत्री म्हणून पाहण्याची सर्वच बारामतीकरांची इच्छा होती. आता ‘वहिनी’ देखील खूप कष्ट घेत आहेत. मला वाटते की, २०२९ ला त्याच निवडणूक लढवतील. ती जागा त्यांनीच मुख्यमंत्री म्हणून घ्यायला पाहिजे, अशी इच्छा जय पवार यांनी व्यक्त केली. तसेच अजितदादा असताना शहरात सर्व व्यवस्थित होते. त्याचप्रमाणे कायदा सुव्यवस्था राखण्याचा आमचा प्रयत्न आहे. जनाई-शिरसाईसह नदी जोड प्रकल्पाला निधी मिळावा यासंबंधी मुख्यमंत्री व सुनेत्रा पवार यांच्यात चर्चा झाली आहे. लवकरच हा निधी मिळणार आहे, असा विश्वास जय पवार यांनी व्यक्त केला.
दरम्यान, राज्यसभा खासदार पदासाठी माझे नाव चर्चेत असले तरी आपण यासाठी इच्छुक नाही. पण मी सर्वांच्या कामासाठी उपलब्ध असेल. या पदावर कोणाला संधी मिळणार, हे मला माहिती नाही. सुनेत्रा पवार व पार्थ पवार हे दिल्लीत आहेत. दोन दिवसांनी मुंबईला गेल्यावर याची माहिती घेईन आणि या विषयावर बोलेन, असे जय पवार म्हणाले.