विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 06:38 IST2026-04-17T06:32:29+5:302026-04-17T06:38:19+5:30
Maharashtra Vidhan Parishad Election 2026: विधानसभेतून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या ९ जागांसाठी १२ मे रोजी मतदान होणार आहे. ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता अधिक आहे. पण महायुतीने एक जादाचा उमेदवार दिला तर अटीतटीची लढत होऊ शकते.

विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
मुंबई - विधानसभेतून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या ९ जागांसाठी १२ मे रोजी मतदान होणार आहे. ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता अधिक आहे. पण महायुतीने एक जादाचा उमेदवार दिला तर अटीतटीची लढत होऊ शकते.
केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. २०२० मध्ये या ९ जागांसाठीची निवडणूक बिनविरोध झाली होती. तेव्हा भाजपला चार, एकत्रित शिवसेनेला दोन, एकत्रित राष्ट्रवादीला दोन आणि काँग्रेसला एक जागा मिळाली होती. विधानसभेचे आमदार या निवडणुकीत मतदार असतात.
यावेळी २०१९ च्या तुलनेत चित्र पूर्णत: बदलले आहे. महायुतीकडे २३५ एवढी आमदार संख्या असल्याने त्यांचे नऊपैकी आठ आमदार जिंकतील, अशी स्थिती आहे. भाजपने सहावा उमेदवार दिला तर निवडणूक चुरशीची होऊ शकेल. मात्र ती शक्यता कमी आहे. विधानसभेतील संख्याबळाचा विचार करता मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा निवडून आणता येणार आहे.
उद्धव ठाकरे पुन्हा आमदार, की?...
उद्धव ठाकरे २०२० मध्ये विधान परिषद सदस्य झाले. त्यांच्या आमदारकीचा कार्यकाळ १३ मे रोजी संपत असताना ते पुन्हा सभागृहात येतील का? याबाबत कमालीची उत्सुकता आहे. त्यांनी पुन्हा एकदा आमदारकी घ्यावी, असा त्यांच्या पक्षात आग्रह असल्याचे म्हटले जाते.
विधिमंडळातील पक्षाची घडी नीट राहावी, यासाठी त्यांचे आमदार होणे गरजेचे आहे, असा मतप्रवाह पक्षात आहे. आता उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात, याबाबत उत्कंठा आहे. ते रिंगणात राहिले तर निवडणूक बिनविरोध करण्याकडे भाजपचाही कल असेल.
राज्यसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या उमेदवारीला महाविकास आघाडीने पाठिंबा दिला होता व ती निवडणूक बिनविरोध झाली होती.
हे आमदार होणार निवृत्त
उद्धव ठाकरे : उद्धवसेना
डॉ. नीलम गोऱ्हे : शिंदेसेना
शशिकांत शिंदे : राष्ट्रवादी - शरद पवार
रणजितसिंह मोहिते पाटील, दादाराव केचे, संदीप जोशी, संजय केणेकर : भाजप
अमोल मिटकरी : राष्ट्रवादी - अजित पवार
राजेश राठोड : (काँग्रेस)
९ जागांसाठी १२ मे रोजी होणार मतदान
अधिसूचना निघणार : २३ एप्रिल
अर्ज भरण्याची शेवटची तारीख : ३० एप्रिल
छाननी : २ मे
अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख : ४ मे
मतदान - १२ मे सकाळी ९ ते दुपारी ४
मतमोजणी : सायंकाळी ५
निवडणूक बिनविराेध करण्यास हालचाली हाेणार.