रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 06:17 IST2026-04-17T06:16:35+5:302026-04-17T06:17:18+5:30
Marathi News: राज्यात १ मे अर्थात महाराष्ट्र दिनापासून ऑटो-रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा चाचणी सक्तीची करण्यात येणार आहे. मात्र, या भाषा प्रावीण्य चाचणीसाठी आवश्यक असलेल्या मानक कार्यपद्धतीच्या मार्गदर्शक सूचना (एसओपी) अद्याप अंतिम झालेल्या नाहीत.

रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
मुंबई - राज्यात १ मे अर्थात महाराष्ट्र दिनापासून ऑटो-रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा चाचणी सक्तीची करण्यात येणार आहे. मात्र, या भाषा प्रावीण्य चाचणीसाठी आवश्यक असलेल्या मानक कार्यपद्धतीच्या मार्गदर्शक सूचना (एसओपी) अद्याप अंतिम झालेल्या नाहीत. परिवहन विभागाकडून १ मेपूर्वी त्या अंतिम करून राज्यातील ५९ प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये (आरटीओ) लागू करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या नियमाची घोषणा करताना, मोटार वाहन नियमांनुसार चालकांना स्थानिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक असल्याचे अधोरेखित केले. मात्र, मुंबईतील अनेक आरटीओ अधिकाऱ्यांना भाषा तपासणी कशी करावी याबाबत संभ्रम असल्यानेच मार्गदर्शक सूचना तयार केल्या जात आहेत. तपासणीदरम्यान चालकांना मराठीतील मजकूर वाचण्यासाठी पुस्तके दिली जाणार आहेत. तसेच, कोणत्याही चालकाला अचानक बोलावून त्याची भाषा चाचणी घेतली जाईल.
१११ चालकांना मराठी येत नाही
चाचपणी म्हणून सध्या मिरा-भाईंदर परिसरात पायलट तपासणी मोहीम सुरू आहे. सुमारे १२ हजार ऑटो-रिक्षांपैकी १,८१७ वाहन चालकांचे मराठीचे ज्ञान तपासण्यात आले. १११ चालकांना मराठी बोलता येत नसल्याचे आढळले. दरम्यान, ‘मराठी वाचता किंवा लिहिता येत नसल्याच्या कारणावरून परवाने रद्द करणे हा सूडबुद्धीने घेतलेला निर्णय आहे. आमचा याला तीव्र विरोध आहे’, असे ऑटो रिक्षा आणि टॅक्सी मेन्स युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी सांगितले.