परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 06:54 IST2026-04-17T06:54:24+5:302026-04-17T06:54:44+5:30
Parthwada 'video scandal: परतवाड्याच्या अयान अहमद नामक नराधमाने स्वतःच्या ऐयाशीसाठी अल्पवयीन मुलींच्या आयुष्याची राखरांगाेळी केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणाची व्याप्ती आता अमरावती शहरातील उच्चभ्रू वस्तीपर्यंत पोहोचली आहे.

परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
अमरावती - परतवाड्याच्या अयान अहमद नामक नराधमाने स्वतःच्या ऐयाशीसाठी अल्पवयीन मुलींच्या आयुष्याची राखरांगाेळी केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणाची व्याप्ती आता अमरावती शहरातील उच्चभ्रू वस्तीपर्यंत पोहोचली आहे. मुख्य सूत्रधार अयान अहमद याच्या जाळ्यात अनेक निष्पाप मुली भरडल्या गेल्या आहेत. अटकेत असलेल्या चार आरोपींना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना २३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
फ्लॅट ठरला ‘हनी ट्रॅप’
सर्वांत संतापजनक बाब म्हणजे अमरावतीच्या कठोरा नाका परिसरातील ‘हनी ट्रॅप’ ठरलेला एक फ्लॅट. आरोपी मानव सुगंधे (२०) याने हा स्वत: भाड्याने घेतलेला फ्लॅट मुलींवर अत्याचार करण्यासाठी अयान अहमदला चक्क ‘तासिका तत्त्वावर’ भाड्याने दिला होता. अहमद (१९) याने त्या फ्लॅटमध्येच दोन मुलींचे लैंगिक शोषण केले. तेथेच ते अश्लील व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आले.
पोलिसांनी केक खाल्ला अन् भरवलाही
काही पोलिसांनी आरोपी अयानचा वाढदिवस साजरा केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. तर, परतवाडा ठाणेदारांनी पीडित मुलींची तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप होत आहे. त्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची एसडीपीओ डॉ. शुभम कुमार यांच्यामार्फत चौकशी होणार आहे. त्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा एसपी विशाल आनंद यांनी गुरुवारी दिला आहे. अयान हा महाविद्यालयीन विद्यार्थी आहे. त्याने सोशल मीडियाचा वापर सावज हेरण्यासाठी केला. ९० टक्के पीडितांना त्याने सोशल मीडियाद्वारे प्रेमाच्या जाळ्यात ओढले. अत्याचाराचा हा खेळ सहा महिन्यांपासून सुरू होता.