तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 08:21 IST2026-04-17T08:20:56+5:302026-04-17T08:21:28+5:30
US-Iran War News: इराणने सन्मानाने अमेरिकेशी करार करावा अन्यथा त्यांना परिणामांना सामोरे जावे लागेल अशी धमकी अमेरिकेचे संरक्षण सचिव पीटर हेगसेथ यांनी गुरुवारी इराणला दिली.

तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
वॉशिंग्टन - इराणने सन्मानाने अमेरिकेशी करार करावा अन्यथा त्यांना परिणामांना सामोरे जावे लागेल अशी धमकी अमेरिकेचे संरक्षण सचिव पीटर हेगसेथ यांनी गुरुवारी इराणला दिली. त्यांनी इराणला भावनिक आवाहनही केले. तुम्ही कराराचा मार्ग निवडाल अशी मी प्रार्थना करतो. हा करार तुम्हाला आणि जगाच्या कल्याणासाठी आवश्यक असल्याचे हेगसेथ म्हणाले. तर, इराणने आमचा अणू कार्यक्रम हा पूर्णपणे शांततामय कारणांसाठी असून अण्वस्त्रे तयार करण्यात आम्हाला कोणताही रस नाही, असे इराणने स्पष्ट केले.
तारखेवर एकमत होईना
इस्लामाबाद : अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चेच्या दुसऱ्या फेरीची तारीख ठरलेली नसल्याचे पाकिस्तानने गुरुवारी स्पष्ट केले. अमेरिका आणि इराणकडून या संदर्भातील अधिकृत माहिती जाहीर होत नसल्याने तारीख निश्चित करता येत नसल्याचे पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याने सांगितले. आपापल्या प्रतिनिधीमंडळात कोण असेल, त्याची व्याप्ती किती असेल आणि ते कोठे मुक्काम करतील, हे अमेरिका आणि इराण मिळून ठरवणार आहेत. त्यानंतर तारीख निश्चित होईल असे पाकिस्तानने सांगितले.
लेबनॉनचा नेतान्याहूंशी संवाद साधण्यास नकार
बैरूत : लेबनॉनचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ औन यांनी गुरुवारी इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्याशी थेट चर्चा करण्यास स्पष्ट नकार दिला. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्याशी फोनवर चर्चा करताना औन यांनी ही भूमिका मांडली. लेबनॉनची ही भूमिका अमेरिकेने समजून घेतल्याचे सांगितले जात आहे.
युरोपकडे विमान इंधनाचा सहा आठवड्यांचा साठा
पॅरिस : आखातातील युद्धाचा सर्वाधिक फटका विमान वाहतुकीला आणि कंपन्यांना बसला असून, युरोपकडे केवळ सहा आठवड्यांचा विमान इंधन साठा शिल्लक असल्याची धक्कादायक माहिती 'आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थे'ने गुरुवारी दिली.