हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 12:33 IST2025-06-30T12:31:40+5:302025-06-30T12:33:46+5:30

Uddhav Thackeray Hindi GR Cancelled: राज्य सरकारने त्रिभाषा सूत्र सक्तीचा करण्याचा निर्णय रद्द केला. या निर्णयानंतर आज उद्धव ठाकरेंनी त्यांची सविस्तर भूमिका मांडली. 

"Whatever the committee, now it is a compulsory subject..."; Uddhav Thackeray warns the Mahayuti government on the issue of compulsory Hindi | हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 

हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 

Hindi GR Cancelled Uddhav Thackeray: त्रिभाषा सूत्रासंदर्भात राज्य सरकारने घेतलेले दोन्ही निर्णय रद्द केले. प्रचंड विरोध झाल्यानंतर सरकारने शासन निर्णय रद्द करत नवीन समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. पण, भविष्यातही अशा पद्धतीची हिंदी सक्ती होऊ देणार नाही, असा इशारा शिवसेनेचे (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

विधानभवनाच्या आवारात माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, "महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जय महाराष्ट्रचा नारा पुन्हा बुलंद झाला. हा नारा बुलंद करण्यात शिवसेना, शिवसैनिक तर आघाडीवर होतेच, पण शिवसेनेसोबत ज्या-ज्या राजकीय पक्षांनी, ज्या ज्या मराठी भाषिकांनी आपापले पक्षभेद विसरून सहभाग घेतला, त्या सगळ्यांना धन्यवाद देतो." 

मातृभाषेचं प्रेम हे पक्षाच्या पलिकडे

"सरकारला शहाणपण सुचले आहे की नाही, हे येत्या काही दिवसात कळेल; पण तूर्त त्यांनी हिंदी सक्तीचा शासन निर्णय रद्द केला. त्यांनी जर रद्द केला नसता, तर ५ तारखेच्या मोर्च्यात भाजप, एसंशिं गटातले, अजित पवार गटातील अनेक मराठी प्रेमी हे सहभागी होणार होते, आणि होणार आहेत. त्यांना सुद्धा मी खास धन्यवाद देतो. मातृभाषेचं प्रेम हे पक्षाच्या पलीकडे असले पाहिजे", असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.  

वाचा >>मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं

"सरकार एक केविलवाणा प्रयत्न केलाय, तरीसुद्धा त्याला आम्ही धन्यवाद देतोय. आता नवीन एक समिती नेमली आहे. त्या समितीमध्ये नरेंद्र जाधव यांच्या पांडित्याचा किंवा बुद्धिमत्तेचा पूर्ण आदर राखून मी सरकारला सांगतोय की, तुम्ही अशी थट्टा करू नका. कारण हा शिक्षणाचा विषय आहे. शिक्षणाच्या विषयात तुम्ही अर्थतज्ज्ञांची समिती नेमली आहे", असा चिमटा उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारला काढला. 

कोणाचीही समिती बसवली तरी हिंदी सक्ती नाही

उद्धव ठाकरे म्हणाले, "समिती कोणतीही असू दे. त्यांनी काही अहवाल देऊ दे. पण, सक्ती विषय आता संपलेला आहे. त्यामुळे कोणाचीही समिती त्यांनी बसवली तरी महाराष्ट्रावर हिंदी सक्ती होऊ शकत नाही, हे काल मराठी माणसाच्या शक्तीने दाखवून दिलं आहे. मी सगळ्यांचे मनापासून आभार मानतोय. ५ तारखेला विजय मेळावा किंवा विजय मोर्चा हा एक-दोन दिवसात, काय आणि कुठे हे जाहीर होईल."

"मला सगळ्यांना सांगायचं आहे की, आपण विखुरले आहोत असं वाटल्यानंतर मराठीद्रोही हे डोकं वर काढतात. काल यांचं डोकं चेपलेलं आहे. फणा वर येऊ नये असे वाटत असेल, तर ही एकजूट आपण कायम ठेवली पाहिजे आणि या एकजूटचीच दर्शन आम्ही ५ तारखेला घडवू", असे उद्धव ठाकरे म्हणाले. 

Web Title: "Whatever the committee, now it is a compulsory subject..."; Uddhav Thackeray warns the Mahayuti government on the issue of compulsory Hindi