१०० कोटींच्या उलाढालीवर प्रश्नचिन्ह; आर्थिक साखळीला बसणार मोठा धक्का ?
By मोरेश्वर मानापुरे | Updated: May 12, 2026 15:50 IST2026-05-12T15:48:55+5:302026-05-12T15:50:21+5:30
लग्नसराईच्या तोंडावर सराफा ओळीत चिंता : १० हजारांहून अधिक कारागीर उद्योगावर अवलंबून

Question mark over turnover of Rs 100 crore; Will the economic chain suffer a major setback?
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : 'वर्षभर सोने-चांदीची अनावश्यक खरेदी टाळा', या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका आवाहनाने संपूर्ण देशातील सुवर्ण बाजारात जणू चिंता पसरली आहे. विशेषतः उपराजधानीची शान असलेल्या आणि विदर्भाची मोठी बाजारपेठ समजल्या जाणान्या नागपूरच्या सराफा ओळीत सध्या या आवाहनाचीच चर्चा रंगली आहे. लग्नसराईच्या तोंडावर आलेल्या या विधानामुळे कोट्यवधींच्या उलाढालीवर चिंतेचे सावट पसरले असून, सराफा व्यावसायिकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
सोने ही केवळ हौस नाही, तर सुरक्षा
पंतप्रधानांचे आवाहन देशहितासाठी किंवा परकीय चलन वाचवण्यासाठी असू शकते, हे मान्य करूनही सराफा व्यावसायिक काही मूलभूत प्रश्न उपस्थित करीत आहेत.
आर्थिक साखळीला बसणार मोठा धक्का ?
नागपूरचा सराफा बाजार हा केवळ मध्य भारताचे व्यापार केंद्र नाही, तर तो हजारो कुटुंबांच्या पोटाचा आधार आहे. जिल्ह्यातील ३ हजारांहून अधिक सराफांकडे रोजची १०० कोटी रुपयांची सरासरी उलाढाल असणाऱ्या या बाजारपेठेत पंतप्रधानांच्या आवाहनाचा परिणाम सणासुदीच्या काळात ठळकपणे जाणवण्याची शक्यता आहे. नागपूर शहरात आणि जिल्ह्यात सुमारे १० हजारांहून अधिक कारागीर प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे या उद्योगावर अवलंबून आहेत. जर ग्राहकांनी सोन्याकडे पाठ फिरवली, तर या कारागिरांच्या घरांत अंधार पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.
"नागपूरच्या सराफा बाजारात सध्या तरी ग्राहकांची गर्दी ओसरलेली नाही. ग्राहकांची खरेदी सुरूच आहे; पण भविष्यात हे आवाहन बंधनकारक होऊ नये. त्यांनी सुचवले आहे की, सोन्याची आयात कमी करण्यासाठी सरकारने 'गोल्ड मॉनिटायझेशन'सारख्या योजना अधिक प्रभावीपणे राबवाव्यात, जेणेकरून घरातील पडून असलेले सोने चलनात येईल."
- अंशुल हरडे, सचिव, नागपूर सराफा असोसिएशन
"सोन्याचे दर आंतरराष्ट्रीय घडामोडींवर अवलंबून असतात. एका वर्षानंतर जर सोन्याचा भाव २ ते २.५ लाखांच्या घरात गेला, तर आज खरेदी टाळणाऱ्या ग्राहकांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. भारतीय संस्कृतीत सोन्याला केवळ धातू मानले जात नाही, तर ती एक भावनिक गुंतवणूक आणि संकटकाळचा सोबती मानले जाते. भाववाढीची टांगती तलवार आहे."
- पुरुषोत्तम कावळे, माजी अध्यक्ष, नागपूर सराफा असोसिएशन
"पंतप्रधानांचे आवाहन आर्थिक शिस्तीसाठी असेल; पण अशा नकारात्मक संदेशामुळे बाजारात भीतीचे वातावरण निर्माण होते. गुंतवणूकदार आणि सामान्य ग्राहकांचा आत्मविश्वास डळमळीत होऊ शकतो. सरकारने उद्योगाशी चर्चा करून संतुलित मार्ग काढायला हवा. आम्ही कौन्सिलचे पदाधिकारी यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा करणार आहोत.
- राजेश रोकडे, चेअरमन, ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी कौन्सिल