मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 17:08 IST2026-05-12T17:07:49+5:302026-05-12T17:08:43+5:30
तामिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी त्यांचे वैयक्तिक ज्योतिषी रिकी राधन पंडित वेट्रिवेल यांना ओएसडी म्हणून नियुक्त केले आहे.

मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
तामिळनाडूचे नवनियुक्त मुख्यमंत्री आणि 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय यांनी प्रशासकीय पातळीवर एक असा निर्णय घेतला आहे, ज्याची सध्या संपूर्ण देशात चर्चा होत आहे. विजय यांनी त्यांचे वैयक्तिक ज्योतिषी रिकी राधन पंडित वेट्रिवेल यांची मुख्यमंत्री कार्यालयात विशेष कर्तव्य अधिकारी अर्थात ओएसडी म्हणून नियुक्ती केली आहे. या संदर्भात तामिळनाडूच्या प्रधान सचिवांनी अधिकृत आदेशही जारी केला आहे.
विजयाची भविष्यवाणी ठरली होती खरी!
रिकी राधन पंडित वेट्रिवेल हे केवळ ज्योतिषीच नाहीत, तर त्यांना तामिळनाडूमध्ये मोठे आध्यात्मिक गुरु मानले जाते. गेल्या सात वर्षांपासून ते विजय यांच्या अत्यंत जवळचे आहेत. विशेष म्हणजे, विधानसभा निवडणुकीच्या बराच काळ आधी त्यांनी भाकीत केले होते की, "जोसेफ विजय यांच्या नावाची त्सुनामी येईल आणि ते मोठ्या बहुमताने मुख्यमंत्री होतील." ही भविष्यवाणी खरी ठरल्याने विजय यांचा त्यांच्यावरील विश्वास अधिकच वाढला आहे.
राजकारणापासून भाषणांपर्यंत सर्व जबाबदारी
आता ओएसडी म्हणून रिकी हे मुख्यमंत्र्यांच्या सावलीसारखे त्यांच्यासोबत राहतील. त्यांचे कार्य केवळ ज्योतिषीय सल्ल्यापुरते मर्यादित नसेल. मुख्यमंत्री ज्या कार्यक्रमांना जाणार आहेत, तिथली त्यांची भाषणे आधी रिकी यांच्याकडे दिली जातील. ते या भाषणांची पडताळणी करतील आणि त्यानंतर ती मुख्यमंत्र्यांकडे सोपवली जातील. पक्षाचे महत्त्वाचे राजकीय निर्णय आणि प्रशासकीय कामातही त्यांचा सल्ला घेतला जाणार आहे.
जयललितांच्या काळापासून मोठा दबदबा
रिकी राधन पंडित वेट्रिवेल यांचा ज्योतिष आणि अंकशास्त्रातील अनुभव तब्बल ४० वर्षांचा आहे. केवळ जोसेफ विजयच नव्हे, तर तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यादेखील महत्त्वाचे निर्णय घेण्यापूर्वी राधन पंडित यांचा सल्ला घेत असत, असे सांगितले जाते. तिरुचेंदूर मंदिर प्रवासादरम्यान विजय आणि राधन पंडित यांचा एकत्र प्रवास खूप चर्चेत आला होता.
प्रशासकीय फेरबदल आणि नवीन पद
मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर विजय यांनी मुख्यमंत्री कार्यालयातील १४ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. विष्णु रेड्डी हे मुख्यमंत्र्यांचे मित्रही त्यांच्या टीममध्ये सक्रिय आहेत. मात्र, रिकी राधन पंडित यांना मिळालेल्या सरकारी पदामुळे आता त्यांची राजकीय आणि प्रशासकीय ताकद मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.