रतलाम शहरातील चिमुकल्या जान्हवी सोनीने आपल्या विलक्षण स्मरणशक्तीने आणि भक्तीभावाने देश-विदेशात पुन्हा एकदा आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अवघं ३ वर्षे ११ महिने वय असलेल्या जान्हवीने 'शिवतांडव स्तोत्रा'चं भावपूर्ण आणि प्रभावशाली पठण २ मिनिटं ५० सेकंदात पूर्ण करून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या यशासह जान्हवीचं नाव लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, वेव्ह वर्ल्ड रेकॉर्ड आणि युनायटेड किंगडम वर्ल्ड रेकॉर्डमध्ये एकाच वेळी नोंदवले गेलं आहे.
इतक्या लहान वयात ही कामगिरी करणं संपूर्ण रतलाम शहर आणि राज्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. जान्हवी सोनीने अत्यंत अचूक उच्चार आणि भावपूर्ण शैलीत शिवतांडव स्तोत्राचं पठण करून आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवली. रेकॉर्ड बुकने तिचं वय, वेळ आणि पाठांतर लक्षात घेऊन या विक्रमाची नोंद केली आहे.
२ मिनिटं ४० सेकंदात हनुमान चालीसाचं पठण
विशेष म्हणजे जान्हवीने यापूर्वीही असे विक्रम केले आहेत. सहा महिन्यांपूर्वी तिने अवघ्या २ मिनिटं ४० सेकंदात हनुमान चालीसाचं पठण करून जागतिक विक्रम आपल्या नावावर केला होता. आता शिवतांडव स्तोत्रासह तिने मिळवलेलं हे दुसरं मोठं आंतरराष्ट्रीय यश आहे.
दिग्गजांकडून कौतुकाचा वर्षाव
जान्हवीच्या या यशाबद्दल केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी तिची भेट घेऊन तिच्या प्रतिभेचं कौतुक केलं आणि तिला आशीर्वाद दिले. तसेच मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा यांनीही जान्हवीची भेट घेऊन तिला रोख पारितोषिक देऊन प्रोत्साहित केलं.
नियमित सराव आणि कौटुंबिक पाठिंबा
जान्हवीच्या पालकांनी सांगितलं की, तिला लहानपणापासूनच धार्मिक स्तोत्रांमध्ये रस आहे. नियमित सराव आणि कौटुंबिक पाठिंब्यामुळे ती इतक्या कमी वयात मोठे विक्रम प्रस्थापित करू शकत आहे. जान्हवीच्या या यशामुळे रतलाम शहरात आनंदाचं आणि अभिमानाचं वातावरण आहे. शहरवासीयांनी या चिमुकलीला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
