१, २, ३ नव्हे तर तब्बल ५ सदस्य बनले लोकप्रतिनिधी; पवार कुटुंबात आता ३ खासदार, २ आमदार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 15:53 IST2026-03-05T15:52:13+5:302026-03-05T15:53:47+5:30
२०१९ मधील लोकसभा निवडणुकीत पार्थ पवारही निवडणुकीच्या रिंगणात होते. परंतु मावळ लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच पवार कुटुंबातील या सदस्याचा निवडणुकीत पराभव झाला.

१, २, ३ नव्हे तर तब्बल ५ सदस्य बनले लोकप्रतिनिधी; पवार कुटुंबात आता ३ खासदार, २ आमदार
मुंबई - महाराष्ट्रात २ एप्रिलला राज्यसभेच्या ७ जागा रिक्त होत आहे. या जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत ७ पैकी २ जागा पवार कुटुंबालाच मिळणार आहे. महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर शरद पवारांनी पुन्हा एकदा राज्यसभेचा अर्ज भरला आहे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून पार्थ पवार यांनाही राज्यसभेची संधी दिली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात घराणेशाहीवरून कायम आरोप प्रत्यारोप होत आलेत. त्यात राज्याच्या राजकीय पटलावर पवार कुटुंब कायम चर्चेत राहिले आहे. २०१९ पर्यंत पवार कुटुंबातील शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे या राजकारणात सक्रीय होते. शरद पवार राज्यसभेत, सुप्रिया सुळे लोकसभेत तर अजित पवार आमदार म्हणून बारामतीतून निवडून येत असे. मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आणखी एक नाव पवार कुटुंबात प्रामुख्याने चर्चेत आले ते म्हणजे रोहित पवार...रोहित पवारांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड मतदारसंघातून निवडणूक लढवून भाजपाचे दिग्गज नेते राम शिंदे यांचा पराभव केला. २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत पार्थ पवारही निवडणुकीच्या रिंगणात होते. परंतु मावळ लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच पवार कुटुंबातील या सदस्याचा निवडणुकीत पराभव झाला.
२०२३ साली अजित पवारांनी शरद पवारांसोबत फारकत घेत आपली वेगळी राजकीय चूल मांडली. त्यानंतरच्या काळात सुनेत्रा पवार राजकारणात सक्रीय होऊ लागल्या. लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी सुप्रिया सुळेंविरोधात निवडणूक लढवली मात्र त्यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. मात्र काही महिन्यांनी सुनेत्रा पवार यांना पक्षाने राज्यसभेवर खासदारकी दिली. एकीकडे शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार तर दुसरीकडे अजित पवार, सुनेत्रा पवार असं राजकीय समीकरण होते. परंतु दुर्दैवाने २८ जानेवारी २०२६ रोजी अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू झाला. अजित पवारांचे अकाली जाणे पवार कुटुंबासाठी मोठा आघात होता. आता अजित पवारांच्या पक्षाचे पुढे काय होणार असा प्रश्न सगळ्यांना पडला. मात्र काहीच दिवसांत सुनेत्रा पवारांनी पक्षाची सूत्रे हाती घेतली.
सुनेत्रा पवारांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देत राज्यात पहिल्या महिला उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची निवड झाली. बारामती पोटनिवडणूक सुनेत्रा पवार लढवतील अशी चर्चा आहे. सुनेत्रा पवार यांच्यापाठोपाठ आता पार्थ पवार यांनाही राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. राज्यात राज्यसभेच्या ७ जागांवर बिनविरोध निवडणूक होणार आहे. त्यामुळे आगामी काळात पवार कुटुंबातील तब्बल ५ सदस्य संसदीय लोकशाही प्रणालीत लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना दिसणार आहेत. त्यात खासदार म्हणून शरद पवार, सुप्रिया सुळे, पार्थ पवार तर आमदार म्हणून सुनेत्रा पवार, रोहित पवार यांचा समावेश आहे.