एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 09:55 IST2025-06-28T09:54:28+5:302025-06-28T09:55:41+5:30

Supriya Sule News In Marathi: राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीच्या विषयावरुन राजकीय वातावरण तापले आहे.

NCP-SCP MP Supriya Sule On Maharashtra govt mandating Hindi as default third language in schools | एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!

एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!

राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीच्या विषयावरुन राजकीय वातावरण तापले आहे. याच मुद्द्यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, अशा शब्दांत त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच येत्या ५ जुलैला हिंदी सक्तीविरोधात शिवसेना उबाठा अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे मोर्चा काढणार आहेत. या मोर्चात सहभागी होणार असल्याचे सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केले.

माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "हा आमच्यासाठी एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे. हा राजकीय मुद्दा नाही. भाषा, शिक्षण हा एक असा मुद्दा आहे, जो खूप गांभीर्याने घेतला पाहिजे. आपण तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पुढे जायला हवे. इतर कोणतेही राज्य अशाप्रकारे काम करत नाही. महाराष्ट्र इतका आग्रही पवित्रा का घेत आहे? हे मला समजत नाही. आपण एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू शकत नाही." त्यावेळी सुप्रिया सुळे यांना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मोर्चात सहभागी होणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर सुप्रिया सुळेंनी आम्ही या मोर्चात पूर्ण ताकदीने सहभागी होणार आहे, असे उत्तर दिले.

 येत्या ५ जुलैला हिंदी सक्तीविरोधात शिवसेना उबाठा अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे मोर्चा काढणार आहेत.  मुंबईतील गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान, असा हा विराट मोर्चा असेल. मोर्चाची वेळ लवकरच जाहीर केली जाईल. हा कोणत्याही पक्षाचा मोर्चा नसेल  तर, मराठीचा अजेंडा असेल. मराठी माणूस या मोर्चाचे नेतृत्व करेल, असे राज ठाकरेंनी आधीच स्पष्ट केले आहे. या मोर्चात सर्वपक्षीयांसह सर्व साहित्यिक, कलाकार, तज्ज्ञ, विद्यार्थी आणि शिक्षकांनी देखील सहभागी व्हावे, असे राज ठाकरेंनी आवाहन केले. त्यामुळे अनेक मराठी कलाकार, साहित्यिक, शाळेतील शिक्षक, राजकीय नेते या मोर्चात सहभागी होतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली.

Web Title: NCP-SCP MP Supriya Sule On Maharashtra govt mandating Hindi as default third language in schools