Rohit Pawar : "आजचं राजकारण हे किळसवाणं, घृणास्पद, माणसाच्या जीवाची किंमत..."; रोहित पवारांची पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 13:10 IST2026-02-04T13:08:32+5:302026-02-04T13:10:24+5:30
NCP Rohit Pawar : रोहित पवार यांनी एक पोस्ट केली आहे.

Rohit Pawar : "आजचं राजकारण हे किळसवाणं, घृणास्पद, माणसाच्या जीवाची किंमत..."; रोहित पवारांची पोस्ट
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर पत्नी सुनेत्रा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावरून विरोधकांनी टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावरून दोन्ही गटातील नेत्यांमध्ये अनेक दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. याच दरम्यान रोहित पवार यांनी एक पोस्ट केली आहे.
"आजचं राजकारण हे किळसवाणं आणि घृणास्पद झालंय. या राजकारणापुढं माणसाच्या जीवाची किंमत अक्षरशः शून्य झालीय... छक्के-पंजे करता येणं हाच राजकारणाचा बेसिक निकष असेल तर चांगल्या व्यक्तीने खरंच राजकारणात राहावं का? असा प्रश्न माझ्यासारख्याला पडल्याशिवाय राहत नाही…!" असं रोहित पवार यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
आजचं राजकारण हे किळसवाणं आणि घृणास्पद झालंय. या राजकारणापुढं माणसाच्या जीवाची किंमत अक्षरशः शून्य झालीय... छक्के-पंजे करता येणं हाच राजकारणाचा बेसिक निकष असेल तर चांगल्या व्यक्तीने खरंच राजकारणात रहावं का? असा प्रश्न माझ्यासारख्याला पडल्याशिवाय राहत नाही…!
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 4, 2026
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरून होणाऱ्या चर्चेवर मुख्यमंत्री फडणवीसांनी जर अशी काही चर्चा सुरू असती तर अजित पवारांनी भाजपाशी चर्चा केली असती असं विधान केले होते. आज बारामतीत झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीसांच्या या विधानावर शरद पवारांनी पलटवार केला. विलीनीकरणाच्या चर्चेत ते कुठेही नव्हते असा उल्लेख करत त्यांना बोलण्याचा काय अधिकार असाही प्रश्न शरद पवारांनी उपस्थित केला.
शरद पवारांनी पत्रकार परिषदेत म्हटलं की, राष्ट्रवादी विलीनीकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना बोलण्याचा काय अधिकार आहे हे मला समजले नाही. या सगळ्या चर्चेत ते कुठेच नव्हते. त्यामुळे त्यावर भाष्य करण्याचा त्यांना काय अधिकार आहे मला माहिती नाही. आमचे सहकारी जयंत पाटील आणि अजित पवार हे विलीनीकरणावर चर्चा करत होते. सध्या विलीनीकरणावर राजकीय चर्चा नाही असंही त्यांनी स्पष्ट केले.
सुनेत्रा पवारांचा शपथविधी झाला, त्यांना संधी दिली हा आनंद आहे. शपथविधीबाबत मला भाष्य करायचे नाही. अजितदादांच्या स्मारकाबाबत मला माहिती नाही. मी ते पेपरमध्ये वाचले. परंतु मला काही कल्पना नाही. ज्या संस्थेच्या जागेची चर्चा लोकांनी केली आहे. त्या संस्थेचा अध्यक्ष मी आहे. त्यामुळे मला ठाऊक असले पाहिजे. अद्याप त्याबाबत आम्ही चर्चाही केली नाही. आम्ही संस्थेचे सर्व एकत्रित बसून त्यावर चर्चा करू. त्यामुळे आज अजित पवारांच्या स्मारकावर भाष्य करणे योग्य नाही असं शरद पवारांनी सांगितले.