मुंबई अन् नवी मुंबई विमानतळाला जोडणाऱ्या मेट्रो ८ मार्गाला मान्यता; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 15:26 IST2026-01-27T15:24:24+5:302026-01-27T15:26:15+5:30
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो मार्ग ८ चे भूसंपादनासह विविध मंजुरीचे कामे पुढील सहा महिन्यात पूर्ण करावी, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई अन् नवी मुंबई विमानतळाला जोडणाऱ्या मेट्रो ८ मार्गाला मान्यता; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत कंत्राटदारांची बिले अदा करण्यापासून शासकीय जमिनीच्या भाडे पट्टी कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याशिवाय मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीत मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळाला जोडणाऱ्या मेट्रो ८ ला मान्यता देण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो मार्ग ८ चे भूसंपादनासह विविध मंजुरीचे कामे पुढील सहा महिन्यात पूर्ण करावी असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीसांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. सोबतच समृद्धी महामार्गाच्या विस्तारित नागपूर - गोंदिया, भंडारा - गडचिरोली महामार्ग कामास गती द्यावी असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले मोठे निर्णय
औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये 'पीएम सेतू' योजना राबविण्यात येणार. होतकरू युवकांना दिलासा. पहिल्या टप्प्यात नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये अंमलबजावणी. पुढच्या टप्प्यात राज्यातील अन्य संस्थांचा समावेश होणार.पीएम सेतू Pradhan Mantri Skilling And Employability Transformation through Upgraded ITIs) मुळे उमेदवारांना रोजगार संधी मिळवणे सोपे होणार. (कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता)
कंत्राटदारांची प्रलंबित देयके अदा करण्यासाठी ट्रेड्स प्लॅटफॉर्म (TReDS Platform), सार्वजनिक बांधकाम विभागाशी निगडित सूक्ष्म, लघू व मध्यम कंत्राटदार- उद्योजकांसाठी सुविधा. (सार्वजनिक बांधकाम)
धुळे येथील जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणीचे पुनरूज्जीवन होणार. राष्ट्रीय सहकारी विकास निगम, नवी दिल्ली यांच्याकडे शिफारस. (वस्त्रोद्योग)
वेगवेगळ्या कारणांसाठी देण्यात येणाऱ्या शासकीय जमीनीच्या भाडे पट्टे कालावधी वाढवून देण्यात येणार. विशेषतः ३० वर्षांसाठी भाडेपट्ट्याने देण्यात येणाऱ्या महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ आणि तसेच, महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनींची विल्हेवाट करणे) नियम, १९७१ मधील तरतुदी अन्वये शासकीय जमिनींचा कालावधी वाढवून देण्यात येणार. (महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क)
केंद्र सरकार किंवा राज्य शासनाच्या ताब्यातील शत्रू संपत्तीच्या विक्री-खरेदीसाठी मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय. (महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क)
मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समिती बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे
समृद्धी महामार्गाच्या विस्तारित नागपूर - गोंदिया, भंडारा - गडचिरोली महामार्ग कामास गती द्यावी
प्रकल्पांचे कामेत विहित कालावधीत पूर्ण करावी, प्रकल्प रेंगाळू नये
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो मार्ग ८ चे भूसंपादनासह विविध मंजुरीचे कामे पुढील सहा महिन्यात पूर्ण करावी. त्यानंतर प्रकल्प पुढील तीन वर्षात पूर्ण करण्यात यावा. प्रकल्प सुरू होण्यापूर्वीच सर्व परवानगी प्राप्त करून घ्याव्यात.
प्रकल्प मान्यता
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मेट्रो मार्ग ८ च्या जोडणीस मान्यता दिली आहे. या मेट्रो मार्गाची एकूण लांबी ३५ किलोमीटर, भूमिगत मार्ग ९.२५ किलोमीटर, उन्नत मार्ग २४.६३६ किमी, एकूण २० स्थानके, ६ स्थानके भूमिगत, १४ स्थानके उन्नत स्टेशन असतील. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल २ स्थानक ते घाटकोपर पूर्व पर्यंत भूमिगत स्थानके, घाटकोपर पश्चिम स्थानक ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल २ स्थानकापर्यंत उन्नत स्थानके, दोन स्थानकांतील सरासरी अंतर १.९ किलोमीटर, ३०.७ हेक्टर भूसंपादनाची आवश्यकता, भूसंपादनासाठी ३८८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित. प्रकल्प पूर्ण होण्यासाठी एकूण २२ हजार ८६२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित.
नाशिक शहर परिक्रमा मार्ग
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर परिक्रमा मार्गाला गती, मार्गाची एकूण लांबी ६६.१५ किलोमीटर या प्रकल्पासाठी एकूण ३ हजार ९५४ कोटीच्या खर्चास मान्यता. गडचिरोली जिल्ह्यातील खनिज वाहतुकीसाठी नवेगाव मोरे - कोनसरी - मूळचेरा - हेदरी - सुरजागड महामार्गाच्या सुधारित ८५.७६ किलोमीटर लांबीस मान्यता, चार पदरी सिमेंट काँक्रिटकरणाचा महामार्ग तयार करण्यात येणार आहे.