“आर्थिक मंदीचं वादळ येतंय, खूप कठीण काळ, मोठा फटका बसेल”; राहुल गांधींनी व्यक्त केली भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 16:28 IST2026-05-19T16:25:49+5:302026-05-19T16:28:05+5:30

Rahul Gandhi News: तुम्ही त्या रचनेचा भाग आहात की त्या वादळाचे बळी?, अशी विचारणा राहुल गांधी यांनी केली आहे.

congress mp rahul gandhi expressed fear said the storm of economic recession is coming very difficult times there will be a big hit | “आर्थिक मंदीचं वादळ येतंय, खूप कठीण काळ, मोठा फटका बसेल”; राहुल गांधींनी व्यक्त केली भीती

“आर्थिक मंदीचं वादळ येतंय, खूप कठीण काळ, मोठा फटका बसेल”; राहुल गांधींनी व्यक्त केली भीती

Rahul Gandhi News: देशावर मोठे आर्थिक संकट येत आहे. आजपर्यंत झाले नाही, असे नुकसान होणार आहे. शेतकरी, मध्यमवर्गीय, गरिबांना याचा मोठा फटका बसणार आहे, असे सांगत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी भीती व्यक्त केली. तसेच अदानी, अंबानी, मोदी यांना याची झळ बसणार नाही, अशी टीकाही राहुल गांधी यांनी केली.

एक्सवरील एका पोस्टमध्ये राहुल गांधी म्हणतात की, एक भयंकर आर्थिक वादळ घोंघावत आहे. मोदींनी १२ वर्षांत जी रचना उभारली, ती केवळ अदानी आणि अंबानींसाठीच होती. आणि आता तीच रचना कोसळण्याच्या मार्गावर आहे. त्यांना काही होणार नाही. त्यांच्याकडे बाहेर पडण्याचा मार्ग आहे. तुम्हाला फटका बसेल. तरुणांना, गरिबांना, मध्यमवर्गीयांना, शेतकऱ्यांना, मजुरांना, लहान व्यावसायिकांचे नुकसान होईल, जे या रचनेचा कधीच भाग नव्हते. तुमच्या आजूबाजूला पाहा. तुम्ही त्या रचनेचा भाग आहात, की त्या वादळाचे बळी? अशी विचारणा राहुल गांधी यांनी एक्स पोस्टमध्ये केली आहे. या एक्स पोस्टसोबत शेअर केलेल्या व्हिडिओत केंद्र सरकारच्या धोरणांवर राहुल गांधी यांनी टीका केली आहे. 

गेल्या अनेक वर्षांत झाले नाही, इतके मोठे नुकसान होणार आहे

आर्थिक मंदीचे वादळ येत आहे. अदानी आणि अंबानी ढाचा त्यांनी तयार केला आहे. तो पूर्णपणे कोसळणार आहे. दुःखद गोष्ट ही आहे की, सामान्य जनतेचे मोठे नुकसान होणार आहे. याचा अर्थ ते आपल्या महालात बसून राहतील आणि तरुणांचा याचा मोठा फटका बसेल. अदानी आणि अंबानी यांना आर्थिक झळ बसणार नाही. मोदींवर याचा प्रभाव होणार नाही. देशातील युवा, शेतकरी, कामगार, लघु उद्योगांना याचा मोठा फटका बसणार आहे. गेल्या अनेक वर्षांत झाले नाही, इतके मोठे नुकसान होणार आहे. खूप कठीण काळ येत आहे. यावर काही उपाययोजना करायचे सोडून नरेंद्र मोदी देशाला सांगत आहेत की, परदेशात जाऊ नका आणि स्वतः नरेंद्र मोदी परदेश दौरे करत आहेत, असे राहुल गांधी यांनी मीडियाशी बोलताना म्हटले आहे.

दरम्यान, अमेरिका इराण युद्ध आणि आखाती देशातील वाढता संघर्ष याचा मोठा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थांवर होताना पाहायला मिळत आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतील वाहतूक निर्बंधांमुळे तेल पुरवठ्याच्या साखळी विस्कळीत झाली आहे. यामुळे अनेक देशांना कच्च्या तेलाचा पुरवठा सुरळीत होण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तेल संकटामुळे अनेक देशांमधील अंतर्गत व्यवहार ठप्प होताना दिसत आहेत. तेल आणि ऊर्जा संकटामुळे जगभरातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांवर नकारात्मक परिणाम होताना पाहायला मिळत आहे. भारतालाही याच्या झळा बसत असल्याचा दावा केला जात आहे. यावरून विरोधक केंद्र सरकार, भाजपावर टीका करत आहेत. 

Web Title : राहुल गांधी ने आर्थिक संकट की चेतावनी दी, मोदी की नीतियों को दोषी ठहराया

Web Summary : राहुल गांधी ने आर्थिक संकट की चेतावनी दी है, उन्होंने अंबानी और अडानी का पक्ष लेने वाली मोदी की नीतियों को दोषी ठहराया है। उनका दावा है कि आसन्न मंदी और बढ़ते वैश्विक तनाव से गरीब और मध्यम वर्ग सबसे ज्यादा पीड़ित होंगे।

Web Title : Rahul Gandhi warns of economic crisis, blames Modi's policies

Web Summary : Rahul Gandhi warns of a looming economic crisis, blaming Modi's policies that favor Ambani and Adani. He claims the poor and middle class will suffer the most from the impending recession and rising global tensions.