डोळ्यात पाणी आणि गावात स्मशानशांतता! पालघरमध्ये एकाच वेळी १२ जणांवर अंत्यसंस्कार, एक चूक महागात पडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 16:19 IST2026-05-19T16:13:06+5:302026-05-19T16:19:41+5:30
पालघरमध्ये झालेल्या भीषण अपघातात एकाच वेळी १३ जणांचा जागीच मृत्यू झाला होता.

डोळ्यात पाणी आणि गावात स्मशानशांतता! पालघरमध्ये एकाच वेळी १२ जणांवर अंत्यसंस्कार, एक चूक महागात पडली
Palghar Accident: ज्या घरामध्ये काही तासांतच साखरपुड्याचा कार्यक्रम होता, त्याच घरातून एकाच वेळी तब्बल १२ जणांच्या अंत्ययात्रा निघाल्याची हृदयद्रावक घटना पालघरमधील बापूगावात घडली आहे. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी झालेल्या एका भीषण अपघातामध्ये १३ जणांना आपला जीव गमवावा लागला. या मृतांपैकी १२ जणांवर आज बापूगाव येथील लाखनपाडा येथे एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. लागोपाठ रचलेली १२ सरणं आणि नातेवाईकांचा आक्रोश पाहून संपूर्ण गावात सध्या सुन्न करणारी शांतता पसरली होती.
अवघ्या अर्ध्या किलोमीटरवर अपघात; एका चुकीने घातला घात
मिळालेल्या माहितीनुसार, बापूगाव येथून सोमवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास एका आयशर ट्रकमधून १०० हून अधिक वऱ्हाडी खडकीपाडा येथे साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी निघाले होते. ट्रकमध्ये नातेवाईक, महिला आणि लहान मुले होती. एकमेकांशी थट्टा-मस्करी करत, गाणी गात सर्वजण नवरीच्या घराच्या अगदी जवळ पोहोचले होते.
धानिवरी पुलाजवळून खडकीपाड्याला जाण्यासाठी हायवेने पुढे जाऊन युटर्न घ्यावा लागतो. मात्र, हा दीड ते दोन किलोमीटरचा वळसा टाळण्याच्या नादात टेम्पो चालकाने वाहन चुकीच्या बाजूने हायवेवर आणले. दुर्दैवाने, त्याच वेळी समोरून येणारा एक भरधाव कंटेनर थेट दुभाजक तोडून या वऱ्हाडाच्या ट्रकवर पलटी झाला. हा अपघात इतका भीषण होता की ट्रकचा जागीच चक्काचूर झाला.
एकाच रांगेत १२ सरणं
या भीषण अपघातानंतर आज लाखनपाडा येथे १२ मृतांवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. हे सर्व मृत एकमेकांचे अत्यंत जवळचे नातेवाईक आणि एकाच गावातील असल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली.
या दुःखाच्या प्रसंगी राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, खासदार हेमंत सावरा, आमदार राजेंद्र गावित, आमदार विलास तरे, आमदार विनोद निकोले आणि आमदार हरिश्चंद्र भोये यांनी गावात जाऊन पीडित कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले.
अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे
या भीषण अपघातात सलोनी शिवराम वळवी, अजय अहाडी, सुनील अर्जुन दांडेकर, चिमा गोविंद कुरहाडा, नमिता विठ्ठल दांडेकर, सारिका संतोष लाखात, रियांशी संतोष लाखात, पांडू गणपत लाखात, काळू गोविंद लाखात, सागर नामदेव शेंडे, वंदना शिवराम वळवी, आयुष सिताराम लाखात आणि सुरेश रत्ना लाखात अशा १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
जखमींच्या उपचारांची जबाबदारी शासनाकडे
या अपघातात इतर १७ वऱ्हाडी गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर डहाणू येथील धुंदलवाडीमधील वेदांता रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मंत्री अशोक उईके यांनी सांगितले की, "जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च आणि त्यांचे पालकत्व आदिवासी विकास विभाग स्वीकारत आहे. तसेच, जखमींच्या नातेवाईकांना रुग्णालयात राहण्याची आणि प्रवासाची पूर्ण व्यवस्था करण्यात आली असून कोणालाही वाऱ्यावर सोडले जाणार नाही." मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत मृतांच्या वारसांना आणि जखमींना तातडीची शासकीय मदत जाहीर केली आहे.