Latest Marathi News LIVE Updates: खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागण्या काय?
LIVE
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 16:22 IST2026-04-20T10:03:11+5:302026-04-20T16:22:53+5:30
महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स...

Latest Marathi News LIVE Updates: खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागण्या काय?
महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स...
LIVE
20 Apr, 26 : 03:07 PM
पार्थ पवार यांचं बारामतीकरांना आवाहन
मला एवढाच मेसेज द्यायचा आहे. सर्वांना माहिती आहे वहिनी निवडून येणार आहेत. अनेक लोक म्हणतील कशाला यायचे मतदान करायला वहिनी निवडून येणार आहेत. पण आपल्याला एक रेकॉर्ड तोडायचा आहे. दोन लाख 17 हजाराचा रेकॉर्ड तोडायचा आहे. त्यामुळे मी विनंती करतो की मतदान करायला बाहेर पडा - पार्थ पवार
20 Apr, 26 : 03:03 PM
जयसिंगराव पवार यांच्या कुटुंबीयांची भेट
ज्येष्ठ इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांचे काहीच दिवसांपूर्वी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनानंतर पवार यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी सोमवारी आमदार रोहित पवार कोल्हापुरात आले होते. यावेळी रोहित पवार यांनी जयसिंगराव पवार यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

20 Apr, 26 : 02:53 PM
दोन रिकाम्या बसला आग
वडाळा आरटीओ कार्यालयामध्ये दोन रिकाम्या बसला आग लागल्याची घटना दुपारी २ वाजताच्या दरम्यान घडली. बस मोकळ्या असल्याने कोणतीही जीवितहानी नाही.

20 Apr, 26 : 02:53 PM
जुनं घर पाडताना भिंत कोसळली, प्राध्यापिका आणि विद्यार्थिनी जागीच ठार
कोल्हापुरातील आजरा तालुक्यात भिंत कोसळून एक प्राध्यापिका आणि विद्यार्थिनी ठार झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत आजरा महाविद्यालयाच्या शिक्षिका ज्योती नितीन कुंभार आणि आजरा हायस्कूलची वैष्णवी भोसले ही विद्यार्थिनी जागीच ठार झाली आहे. तर दुर्घटनेत ललीता भोसले गंभीर जखमी झाली असून जखमींना तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आले आहे. एक जुनं घर जेसीबीच्या साहाय्याने पाडत असताना ही दुर्घटना घडली. घराच्या बाजूने चालत जात असताना प्राध्यापिका आणि विद्यार्थिनी ठार झाल्याची घटना घडली.
20 Apr, 26 : 01:18 PM
खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागण्या काय?
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. खासदार सुळेंनी राज्यातील महिला आणि बालकांवरील अत्याचाराच्या मुद्द्याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.
राज्यात महिला सुरक्षेची स्थिती अतिशय गंभीर आहे. तसेच महिला आणि बालकांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ही अतिशय गंभीर बाब असून राज्यातील सर्वांना सुरक्षित वातावरण देणे ही शासनाची जबाबदारी आहे. याबाबत मी राज्याचे मुख्यमंत्री महोदयांना पत्र लिहिले आहे. या पत्रात… pic.twitter.com/UWkW9r6A5x
— Supriya Sule (@supriya_sule) April 20, 2026
20 Apr, 26 : 12:26 PM
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात
जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात एक बस दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण अपघातात १५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. रामनगरजवळील कनोते गावाजवळून बस जात असताना हा अपघात झाला. वाचा सविस्तर
20 Apr, 26 : 11:48 AM
निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार
टीसीएस कंपनीतील लैंगिक अत्याचार व धर्मांतर प्रयत्न प्रकरणी संशयित फरार निदा खानच्या मागावर ८ एप्रिलपासून एसआयटी पथक असताना तिने ११ एप्रिलला मुंब्रा येथे एका स्त्री प्रसूती तज्ज्ञ महिला डॉक्टरकडे उपचार घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानंतर ती मुंब्रा येथून निसटल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. टीसीएसमधील याप्रकरणी माजी कर्मचारी निदाचे नाव आल्यापासून तिचा शोध सुरू आहे. ती मुंब्रा येथे असल्याची कुणकुण लागल्याने पोलिसांनी तिचा माग काढत तिच्या पतीची चौकशी केली. वाचा सविस्तर
20 Apr, 26 : 11:30 AM
महाराष्ट्रातून १ कोटी महिलांच्या सह्या गोळा करणार- फडणवीस
राज्यभरात आम्ही महिला एकत्रिकरण करणार आणि राज्यातून १ कोटी महिलांच्या सह्या गोळा करणार, महिलांना राजकीय आरक्षण कोणत्याही परिस्थितीत मिळालं पाहिजे ही आमची भूमिका- देवेंद्र फडणवीस
20 Apr, 26 : 11:16 AM
विरोधकांनी विधेयकाची भ्रूणहत्या केली- फडणवीसांचा घणाघात
महिला आरक्षणाच्या विधेयकाला विरोध करत विरोधकांनी विधेयकाची भ्रूणहत्या केल्याचा घणाघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत आहेत.
20 Apr, 26 : 11:10 AM
ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
पश्चिम बंगालमध्ये राजकारण तापलं आहे. ममता बॅनर्जी यांनी व्यासपीठावरून अधिकाऱ्यांना इशारा देताना म्हटलं की, "उद्या भाजपा सत्तेत नसेल... हे लक्षात ठेवा. मला तुमचं नाव, काम आणि ठिकाण सर्व काही माहित आहे. निवडणुकीत तुम्ही नीट काम केलं नाही, तर मला प्रत्येकाची हिस्ट्री माहित आहे, त्यानुसार हिशोब चुकता केला जाईल." दुसरीकडे, पश्चिम बंगालमध्ये टीएमसी (TMC) समर्थकांनीही जनतेला धमकावण्यास सुरुवात केली आहे. वाचा सविस्तर
20 Apr, 26 : 11:00 AM
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत
गोरेगाव नेक्सो सेंटरमधील कॉन्सर्टमध्ये प्रत्यक्ष सहभागी होत एक्स्टॅसी हे पार्टी ड्रग्ज विकणाऱ्या महाविद्यालयीन तरुणांच्या टोळीला विनातिकीट प्रवेश नसलेल्या गेटमधून कॉन्सर्टमध्ये सोडणाऱ्या सुरक्षा रक्षकाला वनराई पोलिसांनी अखेर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
20 Apr, 26 : 10:30 AM
पनवेल रेल्वे स्थानकात लिफ्ट कोसळली
पनवेल रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ७ वरील लिफ्ट कोसळल्याची माहिती समोर आली आहे. या लिफ्टमध्ये चार प्रवासी होते असं सांगण्यात येत आहे.
20 Apr, 26 : 10:10 AM
डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला
मध्य रेल्वेच्या एका रिकाम्या लोकलचे चाक डोंबिवली स्थानकात रुळावरून घसरल्याची घटना सकाळी साधारण ८ वाजून ९ मिनिटांच्या सुमारास घडली. लोकलमध्ये कुणीच नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
20 Apr, 26 : 10:07 AM
अमेरिका-इराणची इस्लामाबादच्या हॉटेलमध्ये होणार चर्चा
अमेरिका आणि इराणमध्ये उद्यापासून इस्लामाबादच्या हॉटेल सेरेनामध्ये चर्चा होणार, दोन्ही देशांच्या शिष्टमंडळात युद्धशांतीबाबत तोडगा निघण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.